Photo Credit- Social Media
कल्याण : आमच्या कार्यकर्त्याला शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांकडून मारहाण झाली. मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पोलिसांकडून दुजाभाव सुरू आहे. आमचे लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवकांना विकास कामासंदर्भात प्रशासनाकडून डावलले जात आहे अशी व्यथा भाजपा जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या घरी वैयक्तिक भेटीसाठी आले होते. यादरम्यान भाजप नेत्यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना कुणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख अप्रत्यक्षरित्या शिवसेना शिंदे गटाकडे होता. त्यामुळे भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून वादावर पडदा पडल्याचे बोलले जात असले तरी कल्याण मध्ये भाजप आणि शिंदे गटात धुसफूस सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचे कल्याण पूर्वेमध्ये भेट घेतली. वैयक्तिक कारणानिमित्त ही भेट असल्याचे सांगण्यात आले. मराठा आरक्षणासाठी तरुणांनी आत्महत्या करू नये, तरुण हे देशाचे भविष्य आहेत, आपल्याला आरक्षण मिळणार आहे. थोडासा संयम ठेवा असे आवाहन भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मराठा तरुणांना केले आहे. यावेळी भाजप माजी आमदार नरेंद्र पवार जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी कल्याण लोकसभा प्रभारी शशिकांत कांबळे महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मात्र या भेटीदरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले. पोलीस प्रशासन, भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सहकार्य करत नसल्याचा आरोप करत पोलीस दुजाभाव करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. काही दिवसांपूर्वी भाजपच्या कार्यकर्त्याला शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांनी मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला मात्र दुर्योधन पाटील यांच्यावर अद्याप काहीच कारवाई झाली नाही. भाजपची सत्ता असूनही पोलीस भाजप कार्यकर्त्यांसोबत दुजाभाव करत असल्याचे फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले.
विकास कामाबाबत देखील प्रशासन भाजपचे माजी नगरसेवक लोकप्रतिनिधींना डावलत असल्याचे देखील पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. या भेटीदरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांचा रोख सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाकडे होता. एकंदरीतच कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट व भाजप मधील वाद अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. याबाबत भाजप व शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटला असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र आज पुन्हा एकदा भाजप पदाधिकाऱ्यांनी सत्तेत असून देखील भाजप सोबत दुजाभाव सुरू आहे, दुजाभाव केला जात असल्याची व्यथा फडणवीसांसमोर मांडली. त्यामुळे शिवसेना शिंदे गट व भाजप मधील कायमच असल्याचे दिसून येतेय.