कर्जत नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी डॉ धनंजय जाधव,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पालिका मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, निवडणूक नायब तहसीलदार सचिन राऊत यांच्या उपस्थितीत मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. निवडणूक विभागाने या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक,महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी यांना नेमण्यात आले आहे.
या निवडणुकीसाठी दहा प्रभागात 33 मतदान केंद्र असून एका मतदान केंद्रासाठी मतदान केंद्र अधिकारी,सहायक मतदान केंद्र अधिकारी,मतदान अधिकारी,एक शिपाई आणि एक पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.त्यासाठी 200 कर्मचारी तैनात करण्यात आले असून तीन प्रभागासाठी लागणारे कर्मचारी यांना राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.
कर्जत शहरात कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मतदान केंद्र परिसरात मतदार यांचे प्रतिनिधी तसेच झोनल अधिकारी यांना प्रवेश असणार आहे.मतदान केंद्र येथे आज दुपार पासून कर्मचारी पोहचले असून निवडणूक यंत्रणा उद्या होणाऱ्या मतदानासाठी सज्ज आहे.उद्या 33 मतदान केंद्रावर 29957 मतदार मतदान करणार असून थेट नगराध्यक्ष पदासाठी दोन आणि 21 सदस्य यांच्यासाठी 46उमेदवार रिंगणात आहेत.






