पुणे : कसबा पेठ (Kasba Bypoll) आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोचली आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी झाली आहे. कसबा पेठ विधानसभेच्या निकालाचा कल सकाळी अकराच्या सुमारास कळेल, तर चिंचवडच्या निकालाचा कल हा साधारण एक वाजता स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यातील या दोन मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत चुरस निर्माण झाली. दोन्ही ठिकाणी पन्नास टक्क्याहून अधिक मतदान झाले आहे. विशेषत: कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही भाजपकडून प्रतिष्ठेची केली गेली. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजपची यंत्रणा अधिक ‘सक्रीय’ झाल्याने चुरस निर्माण होऊन निकालाविषयी उत्सुकता निर्माण झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात थेट लढत होत आहे.
मतमोजणीची तयारी पूर्ण
कसबा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, आज सकाळी आठ वाजता कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदामात ही मतमोजणी सुरु होईल. मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सर्वप्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे 50 अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
धंगेकर की रासने?
कसबा हा तुलनेने लहान मतदारसंघ आहे. त्यामुळे इथे निकाल लवकर लागेल. पुण्यात कोरेगाव पार्क भागातील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात मतमोजणी होणार आहे. यामुळे वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. या पोटनिवडणुकीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत धंगेकर की रासने कोण विजयी होणार याचं चित्र उद्या स्पष्ट होईल.