सध्या नवरात्रीचं भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र दुसरी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. KDMC च्या निष्काळजीपणामुळे आणि परिसरातील नागरिकांच्या असंवेदनशीलतेमुळे 13 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवरात्रीच्या भंडाऱ्यात 13 वर्षाचा मुलगा जेवण करायला गेला होता. त्यावेळी बाजूला असलेले नाल्याचे झाकण उघडे होते. त्याचवेळी नजरचुकीमुळे अपघात झाला आणि हा मुगला नाल्यात पडला.
आपला मुलगा नाल्यात पडल्याचं कळताच त्याच्या आईवडिलांनी आजूबाजूला मदत मागितली. मात्र भंडाऱ्याला आलेल्या लोकांनी मुलाच्या आई वडिलांच्या याचनेकडे डोळेझाक केलं. आमच्या मुलाला वाचवा अशी काकुळतेने मदत मागणाऱ्या मुलाच्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करत जमाव भंडाऱ्यात मग्न होता. काही वेळानंतर एका तरुणाने उडी मारली आणि त्या मुलाला बाहेर काढले मात्र तोवर फार उशीर झाला होता. 13 वर्षाच्या आयुष कदम या मुलाचा उपचाराआधीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
हा सगळा प्रकार संतापजनक असून असंवेदनशील देखील आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आयुषला आधीच हॉस्पीटलमध्ये आणता आलं असतं तर आज तो वाचला असता. प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या महापालिका आणि एम एम आय डी ए अधिकाऱ्यांच्या विरोधा कारवाईची मागणी केली जात आहे. एवढेच नाही आयुष्याच्या कुटुंबाला प्रशासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
आयुषच्या वडीलांच्य़ा म्हणण्य़ाप्रमाणे , त्यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी अनेकांकडे मदत मागितली मात्र सगळ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. असंवेदनशील माणसांमुळे आणि पालिकेच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलाचा बळी गेला असं आयुषच्या वडीलांनी आरोप केले आहेत.
ही घटना डोंबिवली पश्चिमेत सरोवर नगर येथील आहे.रविवारी रात्री या परिसरात राहणारा 13 वर्षाचा आयुष कदम भंडाऱ्यासाठी घराबाहेर पडला. घरच्या लोकांना सांगितले की, मी जेवण करून येतो. मात्र तो घरी आलाच नाही. कुटुंबीय मंडपाजवळ पोहोचले. त्यांना माहिती मिळाली की, आयुष मंडपाजवळ असलेल्या नाल्याचा उघड्या झाकणातून नाल्यात पडला आहे. आयुष्याचे कुटुंब मंडपाजवळ जेवण करणाऱ्या लोकांना आणि त्या ठिकाणी भांडी घासणार्या महिला आणि पुरुषांना मुलाला वाचवण्यासाठी विनवणी करीत होते. परंतु कोणीही आयुष्याच्या कुटुंबीयांना दाद देत नव्हते. अखेर काही तरुण पुढे आले. त्यांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
मात्र काही सुरक्षा यंत्रणेअभावी अग्निशमन कर्मचारी नाल्यात उतरला तयार नव्हते. त्यानंतर वेदांत जाधव हा तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता नाल्यात उतरला. अर्धा तासाच्या शोधा नंतर त्याने आयुष्यला बाहेर काढले. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र त्याआधीच आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात नाल्याचे झाकण उघडे राहण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख बाळा म्हात्रे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे हे घटनास्थळी पोहोचले.
या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे तसेच पीडित कुटुंबियाला आर्थिक मदत म्हणून 25 लाखाची मदत प्रशासनाने केली पाहिजे अशी मागणी केली आहे. या घटनेची कारवाई कधी होईल ?आयुष्याच्या कुटुंबीयाला काय मदत होईल हा नंतरच्या भाग आहे. परंतु महापालिका आणि एम एम आर डी ए अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि नागरिकांच्या असंवेदनशीलमुळे आज एका मुलाचा नाहक बळी गेला आहे. त्यामुळे निष्काजी आणि बेजबाबदार मनपा अधिकाऱ्यांवक कारवाई व्हायला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.