कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत तरुणाचा डेंग्यूने मृत्यू, KDMC अतिरिक्त आयुक्तांची अ प्रभाग परिसरात पाहणी
पावसाळ्याच्या आगमनासह साथीचे रोग पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. यंदाच्या हंगामातही त्याचे गंभीर परिणाम दिसून येऊ लागले असून, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एका तरुणाचा डेंग्यूमुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून, अतिरिक्त आयुक्त डॉ. हर्षल गायकवाड यांनी अ प्रभागातील विविध भागांमध्ये साफसफाई, जंतुनाशक फवारणी आणि आरोग्यविषयक उपाययोजनांची सविस्तर पाहणी केली.
अ प्रभागातील वडवली, अटाळी, आंबिवली या परिसरांचा त्यांनी प्रत्यक्ष दौरा केला. यावेळी परिसरातील स्वच्छता व्यवस्था, कचरा संकलन, गटारींची साफसफाई आणि जंतुनाशक फवारणी याचा आढावा घेण्यात आला. या दौऱ्याआधी गायकवाड यांनी एक आढावा बैठक घेऊन प्रभागनिहाय कृती आराखड्याची अंमलबजावणी नीट होत आहे की नाही याची खातरजमा केली.
Mumbai Plane Accident Breaking: मुंबई एअरपोर्टवर मोठा अपघात! मालवाहू ट्रकची विमानाला धडक अन्…
यावेळी नागरिकांना डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाण्याचा साठा घरात किंवा परिसरात जास्त दिवस ठेवू नये, तसेच आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यांच्या दौऱ्यात घराबाहेर ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या ड्रमची त्यांनी स्वतः पाहणी केली आणि ते रिकामे करून त्यामध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली.
अतिरिक्त आयुक्तांनी एका संशयित डेंग्यू रुग्णाच्या घराला भेट देत परिसराची पाहणी केली आणि त्या भागात त्वरित उपाययोजना राबविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. सोसायट्यांच्या आवारात पावसाचे पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
तसेच, सोसायट्यांमधील कुंडया, मनीप्लांटच्या बाटल्या, अनवधानाने ठेवलेली भांडी अशा ठिकाणी पाणी साचल्यास डासांच्या अळ्या वाढू शकतात, हे लक्षात घेऊन अशा गोष्टींची सातत्याने तपासणी करून स्वच्छता राखण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
या दौऱ्यामुळे प्रशासनाची जागरूकता आणि तातडीची कृती दिसून आली असून, साथीचे रोग रोखण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे असल्याचा पुनरुच्चार गायकवाड यांनी केला. महापालिकेच्या आरोग्य विभागासोबत समन्वय साधून प्रत्येक प्रभागात अशीच दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या उपाययोजनांमुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात डेंग्यू, मलेरिया आणि अन्य साथींचा फैलाव रोखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.