गडहिंग्लज : 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमाभागात काळा दिन साजरा करीत निषेध फेरीचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव निपाणी खानापूर भागात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. पोलिसांच्या दबाव तंत्रामुळे बेळगाव येथे वातावरण कमालीचे तापले आहे. महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कर्नाटकात येवू नये, यासाठी कोगनोळी चेक पोस्ट येथे पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.दरमान महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभागचे अध्यक्ष व युवा नेते शुभम शेळके यांना बेळगाव पोलिसांनी तब्बल 5 लाखाचा दंड ठोठावला आहे. अटक करता येईना म्हणून पोलिसांनी हा रडीचा डाव खेळला आहे.
मात्र त्याविरोधात न्यायालयात धाव घेण्यात आली असून पोलिसांनी ठोठावलेल्या दंडाविरोधात प्रधान जिल्हा सत्र न्यायालयात अॅड. महेश बिर्जे यांनी आव्हान दिले आहे. म. ए. समितीचे नेते, कार्यकत्यांना प्रशासन येनकेन प्रकारे त्रास देते. आता तर त्यांनी भरमसाट दंड ठोठावण्याचा आदेश देऊन भारतीय घटनाच पायदळी तुडविली आहे. शेळके यांनी प्रतिबंधात्मक सूचनेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून बेळगाव माळमारुती पोलिसांच्या शिफारशीवरून कायदा व सुव्यवस्था विभाग उपायुक्तांनी तब्बल 5 लाखाचा दंड ठोठावण्याचा आदेश दिला आहे.
मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्षमनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांना नोटिसा दिल्या आहेत. विशेष म्हणजे मध्यवर्ती समितीच्या या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन शांततेत सायकल फेरी काढण्यासंदर्भात चर्चा केली होती आणि काही वेळातच त्यांना या नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे कितीही दबाव आणला तरी सीमा लढा सुरू ठेवला जाणारच, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने 1नोव्हेंबर रोजी राज्योत्सवाचीजोरदार तयारी सुरू आहे. शहरातील चौक, पुतळे यांची स्वच्छता, रंगरंगोटी करण्यात आली आहे. चौका चौकात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
काळा दिनाच्या सायकल फेरीला सर्वस्तरातून पाठिंबा मिळू लागल्याने कर्नाटक पोलिसांकडून दबावतंत्राचा वापर सुरू करण्यात आला आहे. म. ए. समितीच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांकडून खबरदारीची नोटीस बजावली आहे. शांततेच्या मार्गाने काळादिनाची सायकल फेरी काढली जात असतानाही पोलिसांकडून नोटिसीद्वारे आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मध्यवर्ती म. ए. समितीने धर्मवीर संभाजी उद्यानापासून2023-24 मध्ये सायकल फेरी काढली होती. अशा फेरीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, असे कारण देत पोलिसांनी एका वर्षाच्या कालावधीसाठी 5 लाखांची वैयक्तिक हमी व तितक्याच रकमेचा जामीन सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मार्केट पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांनी ही नोटीस बजावली आहे.






