शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : चारित्र्याच्या संशयावरुन भुयेवाडीत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. शालन जयसिंग हजारे (वय २३, रा. भुयेवाडी, ता. करवीर) असे जखमी महिलेचे नाव आहे.
कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात शालन यांच्यावर उपचार सुरू आहेत. पती जयसिंग बाळासाहेब हजारे याच्याविरोधात शालन यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १८) सकाळी दहा वाजता घडली. रात्री उशिरा याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली.
याबाबत पोलिसांतून व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, की जयसिंग हजारे हा मेंढपाळ व्यवसाय करतो. भुयेवाडी येथील जामदार शेतात शुक्रवारी सकाळी शालन या जयसिंगला जेवण देण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी जयसिंगने शालनवर चारित्र्याचा संशय घेतला. यातून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाले. रागाच्या भरात जयसिंगने शालनवर पातळी कुऱ्हाडीने प्रथम डाव्या हातावर आणि नंतर उजव्या हातावर वार केला. यामध्ये शालन जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
दरम्यान, सीपीआर पोलिस चौकीत याची नोंद झाली. त्यानंतर हे प्रकरण करवीर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.






