कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी जेरबंद
कोल्हापूर : कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार मास्टरमाईंड असून, त्याच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली. मिरजमधील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली. इनोव्हा कारसह १ कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मास्टरमाईंड पोलीस हवालदार इब्रार आदम इनामदार (वय ४४, रा. विश्वकर्मा अपार्टमेंट, कसबा बावडा, कोल्हापूर), सुप्रीत काहाण्या देसाई (वय २२, रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), राहुल राजाराम जाधव (वय ३३, रा. लोकमान्य नगर, कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (वय ४०, रा. वनश्री अपार्टमेंट, टाकळा, राजारामपुरी, कोल्हापूर), सिध्देश जगदीश म्हात्रे (वय २८, रा. रिध्द गार्डन, ए.के. वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेसवर निलजी बामणी येथे एकजण बनावट नोटा खपवण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकसह छापा टाकून सुप्रीत देसाई याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ४२ हजार रुपये किमतीच्या पाचशेच्या ८४ बनावट नोटा सापडल्या. त्याला कार आणि नोटासह ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर पोलीस हवालदार इब्रार इनामदार याच्या कोल्हापूर येथील रुईकर कॉलनी येथील ऑफिसमधून नोटा तयार करण्यासाठी लागणारे लॅपटॉप, प्रिंटर तसेच अन्य साहित्य जप्त केले.
दरम्यान, या नोटा वितरित करण्यात सहभाग असणारे राहुल जाधव, नरेंद्र शिंदे तसेच मुंबई येथील सिद्धेश म्हात्रेला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून इनोव्हा कार, पाचशे रुपयांच्या १९ हजार ६८७ बनावट नोटा, दोनशे रुपयांच्या ४२९ नोटा, स्कॅनर, प्रिंटर असा १ कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार मास्टरमाईंड
चलनातील पाचशे, दोनशे रुपयांच्या हुबेहूब नोटा तयार करून त्या खपवण्यासाठी मिरजेत आलेल्या एकाला अटक करून सखोल चौकशीनंतर बनावट नोटांचा पर्दाफाश करण्यात आला. कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार कार्यरत असणाऱ्या मास्टरमाईंडसह कोल्हापूर जिल्ह्यातील चौघासह मुंबईतील एक अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : Beed: पवनचक्की टॉवर प्रकरणात पोलिस-शेतकरी आमनेसामने, तुझं कॅरेक्टर खराब करून टाकतो…; व्हिडिओ व्हायरल