ऊस दर आंदोलनाची तीव्रता वाढवणार ?
साखर सहसंचालक कार्यालयासमोर शेतकरी आक्रमक
कोल्हापूर: ऊसदर प्रश्नाबाबत साखर सहसंचालक कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनास महिला शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. ऊसदराचा प्रश्न सुटल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही, अशी भूमिका सर्व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.रविवारी सुट्टी असूनही तिसऱ्या दिवशी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आजच्या आंदोलनासाठी कोल्हापूरमधील पन्हाळा तालुक्यातून शरद जोशी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव जाधव यांच्यासह त्यांच्या महिला आघाडीनेही सहभाग घेऊन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
पदवीधर मित्र संघटनेचे अध्यक्ष माणिक पाटील, चुयेकर यांनी ऊस दराच्या लढ्यामध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या बरोबर लढा तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. आंदोलनामध्ये शिवाजी माने, भगवान काटे, रुपेश पाटील, ज्ञानदेव पाटील,अशोकराव जाधव, माणिक पाटील चुयेकर, बाळ नाईक, संभाजीराव चौगुले, विलास पाटील, तातोबा कोळी, नानासाहेब भोसले आदींसह पन्हाळा ते तालुक्यातून रूपाली घोलपे, भाग्यश्री गुरव, मनीषा पाटील, अक्काताई पाटील, सीमा घोरपडे,शीला पाटील आदी महिला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या. मोर्चाला संबोधित करताना माणिक पाटील चुयेकर आदी उपस्थित होते.
पन्हाळा शेतकरी संघटना महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली धौलपे यांनी सोमवार दि. 10 रोजी पर्यंत संघटनेने केलेल्या कायदेशीर मागण्यांच्या बाबतीत साखर सहसंचालकांनी निर्णय घेऊन, सर्व कारखान्यांवरती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा सर्व महिलांना घेऊन साखर सहसंचालकांना बाहेर पडून देणार नाही, असा इशाराही दिला आहे. आमच्या घामाच्या हक्काच्या लढाईसाठी आम्ही आता रणरागिनी मागे राहणार नाही, याच्या कोण आडवे आले तर त्याला तुडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा देखील त्यानी दिला.






