विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी या ऑपरेशनसाठी त्यांची संपूर्ण यंत्रणाच कामाला लावल्याचं म्हटलं जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आमदार, खासदारांना पदाधिकाऱ्यांना घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यातच शिंदे आता कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
पूर्वीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार सुजित मिंचेकर हे शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोल्हापुरच्या राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
माजी आमदार सुजित मिंचेकर हे 2009 व 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून हातकणंगले मतदारसंघातून विजयी झाले होते. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते माजी आमदार राजुबाबा आवळे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर राज्यात झालेल्या शिवसेनेतील दुफळीनंतर मिंचेकर यांनी ठाकरे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला.
2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील झालेल्या जागा वाटपाच्या अडचणीमुळे सुजित मिंचेकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून त्यांनी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून 2024 ची निवडणूक लढवली. मात्र, त्यानंतरही त्यांना पराभव स्वीकारावा लागला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अवस्था पाहता शिवाय पुढील राजकीय भवितव्याची चिंता पाहता माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी पुढील राजकीय दिशा ठरवली आहे. येत्या दोन दिवसांत ते मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शिंदेंच्या शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्ह्यात शिवकार्य अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माजी आमदार सुजित मिंचेकर आणि खासदार धैर्यशील माने यांच्यात देखील चर्चा झाली.
बैठकीनंतर माजी आमदार मिंचेकर यांनी लावलेली उपस्थितीमुळे शासकीय विश्रामगृहात याची चर्चा रंगली होती. माजी खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने यांची केवळ भेट घेण्यासाठी आलो असल्याचे स्पष्टीकरण मिंचेकर यांनी दिले. मात्र, या भेटीमागचे कारण पक्षप्रवेशासंदर्भातच होते,अशी चर्चा त्या ठिकाणी रंगली.
राज्यात महायुतीचे सरकार आहे. महायुती म्हणून सरकारने लोकांच्या प्रतिविश्वास तयार केला आहे. त्यामुळे इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा ओघ महायुतीकडे वाढला आहे. येणाऱ्या काळात शिंदेंच्या शिवसेनेकडे देखील अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. जिल्ह्यातील विरोधकांना मोठा दणका बसणार आहे असा विश्वास, खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी या बैठकीदरम्यान व्यक्त केला.