निधीअभावी आशांच्या प्रशिक्षणाला ग्रहण! आरोग्य विभागावर होणार परिणाम; ३५४ नियुक्त महिला प्रशिक्षणाविना
यवतमाळ ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या कणा मानल्या जाणाऱ्या स्वयंसेविकांच्या प्रशिक्षणालाच निधीअभावी खीळ बसल्याचे समोर आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात नुकत्याच नियुक्त झालेल्या आशा ३५४ स्वयंसेविकांचे अनिवार्य प्रशिक्षण निधीअभावी रखडले असून, त्यामुळे आरोग्य सेवा आणि गावपातळीवरील आरोग्य उपक्रमांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आशा सेविका या ग्रामिण आरोग्य व्यवस्थेचा कणा मानल्या जातात. त्यांना योग्य प्रशिक्षण देवून त्यांना कार्यात सामावून घेणे गरजेचे आहे. नव्याने नियुक्त आशा स्वयंसेविकांना इंडक्शन, एचबीएनसी आणि एचबीवायसी या टप्प्यांचे प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध नसल्याने प्रशिक्षण प्रक्रिया सुरूच करता आलेली नाही.
जिल्ह्यात ३३ आशा स्वयंसेविकांसाठी इंडक्शन प्रशिक्षण, १४५ जणींसाठी एचबीएनसी आणि १७६ आशा एचबीवायसी प्रशिक्षण प्रस्तावित आहे. या प्रशिक्षणासाठी एकूण १२ बॅच आयोजित कराव्या लागणार असून त्यासाठी १३.८६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. संबंधित निधी तातडीने मंजूर करून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी राज्य आरोग्य अभियानाकडे केली आहे.अद्यापही या निधीसाठी मंजुरी मिळालेली नाही.
आशा स्वयंसेविका या ग्रामीण भागातील आरोग्य सेवेतील सर्वात महत्त्वाचा दुवा मानल्या जातात. गर्भवती महिलांची नोंदणी, लसीकरण, नवजात बालकांची काळजी, कुपोषण प्रतिबंध, गृहभेटी, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य रोगांबाबत जनजागृती आणि विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी ही जबाबदारी त्यांच्यावर असते. अशा परिस्थितीत आवश्यक प्रशिक्षणाविना त्यांना प्रत्यक्ष सेवेत उतरावे लागत असल्याने आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, राज्य शासन ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचा दावा करत असताना दुसरीकडे मात्र अत्यल्प निधीअभावी आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षणच रखडल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला आवश्यक मनुष्यबळ असूनही त्याचा पूर्ण क्षमतेने उपयोग होत नाही.
जिल्ह्यात माता व बालमृत्यूदर कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी एचबीएनसी (होम बेस्ड न्यूबॉर्न केअर) १ ते ४ आणि एचबीवायसी (होम बेस्ड यंग चाइल्ड केअर) ही आशा स्वयंसेविकांची प्रशिक्षणे अद्याप नसल्याची बाब समोर आली आहे. एचबीएनसी १ अनेकांना मिळालेली केलेल्या आशा स्वयंसेविकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नवजात बालक व स्तनदा मातांना नियमानुसार सहा वेळा घरी भेट देणे बंधनकारक असते. या भेटीदरम्यान माता व बालकांच्या आरोग्याची तपासणी, आवश्यक समुपदेशन आणि संभाव्य धोके ओळखून वेळेत उपचारासाठी मार्गदर्शन केले जाते.






