२५ लाखांची उधळपट्टी? स्वतःची वाहने असतानाही झाडांच्या छाटणीसाठी खासगी वाहनांवर महापालिकेचा भर
महापालिकेने भारतीय हवामान विभाग आणि ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या मुसळधार पाऊस आणि ताशी ७५ ते ८० किमी वेगाच्या वाऱ्याच्या इशाऱ्याचा आधार घेत हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. ७ जुलै २०२६ रोजी महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या तातडीने छाटण्याचे निर्देश देण्यात आले. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, शहरातील मोठ्या प्रमाणावरील वृक्षसंख्या लक्षात घेता महापालिकेची विद्यमान दोन हायड्रॉलिक शिडी वाहने अपुरी पडत होती.
याच पार्श्वभूमीवर नियमित निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागणार असल्याने आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून विविध कंपन्यांकडून दरपत्रके मागविण्यात आली. त्यामध्ये सर्वात कमी दर देणाऱ्या एम. के. इन्फ्राटेक या संस्थेकडून चालक, ऑपरेटर आणि इंधनासह दोन मॅक लिफ्टन वाहने भाड्याने घेण्यात आली असून, ७ जुलैपासून प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या कामासाठी सुमारे २५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, तो सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील “नवीन वाहन खरेदी” या लेखाशीर्षाखालील तरतुदीतून करण्याचा प्रस्ताव आहे. या खर्चास स्थायी समितीची आर्थिक व प्रशासकीय मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मात्र, या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महापालिकेकडे आधीपासून उपलब्ध असलेल्या दोन हायड्रॉलिक वाहनांचा पूर्ण क्षमतेने वापर का झाला नाही? अतिरिक्त वाहने कायमस्वरूपी खरेदी करण्याऐवजी भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय का घेण्यात आला? तसेच आपत्कालीन परिस्थितीचे कारण देत नियमित निविदा प्रक्रिया टाळणे कितपत योग्य होते, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
विरोधकांनी या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली असून, “आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली सार्वजनिक निधीची उधळपट्टी केली जात आहे का?” असा सवाल उपस्थित केला आहे. दुसरीकडे, प्रशासनाने हा निर्णय पूर्णपणे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी घेतल्याचा दावा केला आहे. स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर हा खर्च अंतिम होणार असून, या प्रस्तावाकडे आता नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






