Latur Ganjgolai Traffic: रिक्षा–हातगाड्यांनी गंजगोलाईचा श्वास रोखला! वाहतूक कोंडीने नागरिक हैराण (photo-social media)
Latur Ganjgolai Traffic: लातूर शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंजगोलाई परिसरात सध्या वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर बिनधास्त उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि ठिकठिकाणी लावलेल्या हातगाड्यांमुळे या भागात दिवसभर वाहतूक कोंडी होत असून नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे गंजगोलाईचा श्वास रोखला जात आहे.
गंजगोलाई ही केवळ शहराचीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याची महत्त्वाची बाजारपेठ आहे. ग्रामीण भागातून तसेच जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतून नागरिक रोज येथे खरेदीसाठी येतात. मात्र, बाजारपेठेच्या मध्यवर्ती रस्त्यांवर अनियंत्रित रिक्षा थांबे आणि हातगाड्यांचा वाढता विळखा यामुळे वाहतुकीचा गोंधळ वाढत आहे, यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.
हेही वाचा: “विलासराव देशमुख आठवणी पुसल्या जातील…लातूरमधील रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावरुन रंगलं राजकारण
वृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी हा परिसर अधिकच धोकादायक ठरत आहे. वाहतूक कोंडीचा परिणाम बाजारपेठेतील व्यवहारांवरही होत आहे. अनेक ग्राहक गोंधळ आणि गर्दी टाळण्यासाठी गंजगोलाईत येण्याचे टाळत असल्याने नियमाने व्यवसाय करणार्या व्यापा-यांचे नुकसान होत आहे. दुकानासमोरच उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि हातगाडळांमुळे ग्राहकांना दुकाने मांडणे कठीण होत असल्याची तक्रार व्यापा-यांकडून केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिस आणि महापालिकेने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिक व व्यापाऱ्यांकडून होत आहे. रिक्षांसाठी नियोजनबद्ध व स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करणे, हातगाड्यांसाठी निश्चित जागा ठरवणे आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. अन्यथा गंजगोलाईतील रोजचा बाजारपेठेचा व्यवहार आणि लातूर शहराची वाहतूक व्यवस्था आणखी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
काही रिक्षाचालक रस्त्यावरच रिक्षा उभ्या करून प्रवासी घेत असल्याने वाहतुकीची एक लेन पूर्णपणे बंद होते. या परिस्थितीचा घंट फटका दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना बसत आहे. वाहनांना पुढे जाण्यासाठी जागा मिळत नसल्याने लांबच लांब रांगा लागतात. पादचा-यांना कसरत करत मार्ग काढावा लागत आहे.






