indapur politics
इंदापूर : विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या राज्याचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. अशातच महायुतीत सुरु असलेल्या कुरघोड्याही समोर येऊ लागल्या आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमधून विधानसभेसाठी तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनीही दंड थोपटत हॅट्रिक गाठणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गटानेही शड्डू ठोकले आहेत. त्यामुळे इंदापुरात आगामी विधानसभा निवडणुकांची रंगत वाढणार असल्याचे दिसू लागले आहे,
दोन दिवसांपूर्वी इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी ‘विमान चिन्हाच्या लागा तयारीला’ असे बॅनर झळकावले होते. त्या बॅनरच्या शेजारीच दत्तात्रय भरणे यांच्या समर्थकांनी, ‘आमचं ठरत नसतं, फिक्स असतं’ अशा मजकुरांचे बॅनर लावत प्रत्युत्तर दिले.तर भाजप, राष्ट्रवादीनंतर आता शरद पवार यांच्या गटाचा बॅनरमुळे राजकीय वर्तुळात सुरू असलेली जुगलबंदी समोर आली आहे.
शरद पवार यांच्या समर्थकांनी ‘आजपर्यंतचा इतिहास साहेब म्हणतील तोच इंदापूर विधानसभेचा आमदार’ अशा आशयाचा बॅनर लावला आहे. या बॅनरवर शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे, तीनही पक्षांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमच्याच पक्षाचा उमेदवार निवडून येणाऱ असल्याचा दावा केला आहे. या तीनही पक्षांच्या बॅनरबाजीने इंदापुरातील विधानसभा निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, इंदापूरची विधानसभेची जागेसाठी 2019 साली हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये गेले. तर 2019 ला भले आघाडी तुटली तरी चालेल पण इंदापूरची जागा सोडणार नसल्याचा हट्टच अजित पवार यांनी केला होता. महाविकास आघाडीतून बाहेर पडत अजित पवार हेदेखील भाजपमध्ये सहभागी झाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा इंदापुरची जाहा कोणाला मिळणार यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.
अजित पवार इंदापुरच्या जागेसाठी अडून बसतील आणि ती जागा दत्तात्रय भरणे यांना मिळू शकते, असे संकेत दिसू लागले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच अपक्ष म्हणून लढण्याची तयारी सुरु केल्याचे या बॅनरमधून दिसत आहेत.