मुंबई : महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकला असल्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, कपिल पाटील, एमआयएमचे आमदार यांना बैठकीला बोलावलं होतं. त्या बैठकीत चर्चा करुन चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांना याबाबत एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये चहापानावरील बहिष्काराचं कारणं दिलं आहे.
राज्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. पण मूळात हे सरकारचं लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुडवून अस्तित्वात आलेलं सरकार आहे. त्यामुळे शिंदे सरकार हे विधीमान्य सरकार आहे. आम्ही अधिवेशनाआधीच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे”, असं अजित पवार म्हणाले. तसंच सत्ताधाऱ्यांकडून राज्यातील प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात असून नको त्या विषयांना महत्व दिलं जात असल्याचंही ते म्हणाले.
राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फोनवर हॅलोऐवजी आता वंदे मातरम बोलावं यासंदर्भात केलेल्या विधानाचाही अजित पवार यांनी खरपूस समाचार घेतला. “महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणले जात आहेत. आता कुणी कुणाला भेटल्यावर जय हिंद म्हणतो, कुणी जय हरी म्हणतो. आता मध्येच काय यांनी वंदे मातरम काढलं. आमचा वंदे मातरम म्हणण्याला विरोध नाही. पण हा विषय सध्या महत्वाचा आहे का? महागाईवर बोला, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावला आहे त्याचं काय करणार आहात? यावर बोलायला हवं”, असं अजित पवार म्हणाले.