सौजन्य - नवराष्ट्र टीम
मेढा : जावळी तालुक्याच्या विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या हुमगाव-बावधन-वाई रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असून, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या महत्त्वकांशी प्रकल्पाला हिरवा कंदील देत जावळीकरांच्या दीर्घकाळ प्रलंबित स्वप्नपूर्तीच्या दिशेने ठोस पाऊल उचलले आहे. सोमवारी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व शासकीय अधिकाऱ्यांना काम तातडीने सुरू करून पूर्णत्वास नेण्याचे स्पष्ट आदेश मंत्री भोसले यांच्याकडून देण्यात आले आहेत.
या बैठकीत रस्त्याच्या आराखड्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. घाटातील धोकादायक वळणांचा मार्ग टाळून अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर असा बोगदा मार्ग करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शिवेंद्रसिंहराजे यांच्या दूरदृष्टीतून व विचारातून हा निर्णय घेण्यात आल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
या बदलामुळे प्रवास अधिक सुरक्षित जलद आणि सोयीस्कर होणार असून, जावळी तालुक्याच्या दळणवळण व्यवस्थित ऐतिहासिक बदल घडणार असल्याचे मत भाजप मंडल अध्यक्ष संदीप परामणे यांनी यावेळी व्यक्त केले. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी समन्वय साधून प्रत्येक बाबींचा बारकाईने आढावा घेतला. त्यांच्या अभ्यासुवृत्तीमुळे आणि कामातील बारकावे लक्षात घेण्याच्या स्वभावामुळे हा प्रकल्प अडथळ्यांशिवाय पुढे जाईल असा विश्वास उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यात प्रभावी समन्वय साधला जात असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांच्या नेतृत्व- कौशल्यातून आणि अध्यक्ष संदीप परामणे यांच्या सक्रिय सहभागातून या कामाला आवश्यक ती गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
हे सुद्धा वाचा … :तर रस्त्यावर उतरून मारू; अमित ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांना इशारा
जावळी तालुक्याच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा हा रस्ता प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले कटिबद्ध असल्याचे दिसून आले. जावळीकरांच्या विकासासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. हा रस्ता पूर्ण होईपर्यंत मी स्वतः लक्ष ठेवणार असा ठाम विश्वास मंत्री भोसले यांनी यावेळी व्यक्त केला. बैठकीला कार्यकारी अभियंता राहुल आहिरे, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे,तालुकाध्यक्ष संदीप परामणे,प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसिलदार प्रवीण मुदगुल अधिकारी उपस्थित होते.






