कास पठाराचे झाले तरी काय
या परिसरातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी असंख्य पर्यटक विशेषता विविध देशातील पर्यटक साताऱ्यातील कास पठार व परिसराला भेटी देत असतात.जागतिक पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे या ठिकाणी रिसॉर्ट ची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.असंख्य धनदांडग्यांनी या परिसरात जमिनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या आहेत.या धनिकांनी आपले व्यवसाय उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करीत आहेत.
धनदांडग्यांनी लाटले कास
स्थानिक भूमिपुत्रांच्या मुंड्या मुरगळून व दबाव तंत्राचा वापर करून धनदांडग्यांनी लाटलेल्या कास परिसरातील भूमिपुत्रांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केले आहेत. भूमिपुत्रांच्या अज्ञान व अशिक्षितपणा चा लाभ उठून अल्प किमतीत घेतलेल्या जमिनी आता अनेक जण मुंबई पुण्यातील उद्योजकांना चढ्या भावाने विकत आहेत.भूमिपुत्रांच्या जमिनीवर धनिक आता मालामाल होत आहेत.तर अनेक धनिकांनी या ठिकाणी मोठमोठे रिसॉर्ट बांधले आहेत. एकेकाळी जमिनीचे मालक म्हणून मिरवणारे आता त्याच जागेत कामगार म्हणून काम करताना दिसून येत आहेत.हे विदारक चित्र पाहता भूमिपुत्रांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले येथील निसर्ग सौंदर्य त्यांच्या डोळ्यादेखत व्यवसायासाठी नष्ट होताना त्यांच्या मनाला मोठ्या यातना होत आहेत.
कासचे झाले तरी काय?
निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण असलेल्या कासचे भकासीकरण व्यवसायासाठी करण्याचा जणूकाही विडाच या धनिकांनी उचलला की काय अशी शंका आता सातारकरांच्या मनात येऊ लागली आहे.व्यवसायासाठी जमिनीचे सपाटीकरण करताना असंख्य दुर्मिळ वनसंपदा नष्ट होत आहे.त्याचप्रमाणे जैवविविधता ही पण नष्ट होत आहे. अर्थकारणाचे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ही धनिक मंडळी निसर्गाशी एकप्रकारे प्रतारणा करीत आहेत.या धनिकांना ना कायद्याचा धाक ना यंत्रणेचा वचक हम करो सो कायदा याप्रमाणे रिसॉर्टची बांधकामे ते करीत आहेत.
साताऱ्यातील या परिसरातील असंख्य रिसॉर्ट हे बेकायदेशीर व अनधिकृतपणे उभे राहिलेले आहेत.बोकाळलेल्या व्यवसायामुळे परिसरातील शांततेला आता गालबोट लागत आहे.या परिसरातील निसर्ग सौंदर्य तर धोक्यात आलेच आहे.पण परिसरात वाढलेल्या रिसॉर्ट मधून बारबाला नाचविण्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. सातारच्या सुसंस्कृत संस्कृतीला यामुळे आता धोका निर्माण झाला आहे.निसर्ग सौंदर्याच्या रक्षणाबरोबरच आता सातारच्या सुसंस्कृत संस्कृतीच्या रक्षणासाठी ही सातारकरांनी खरंतर संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे.
वाढती गुन्हेगारी
परिसरातील गुन्हेगारांचे वाढते प्रस्थ, ड्रग्स व अंमली पदार्थांचा वाढता व्यापार पाहता भविष्यात सातारकरांना ही डोकेदुखी ठरणार आहे.काही दिवसापूर्वी परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये बारबाला नाचविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.धनिकांच्या मनमानी कारभारामुळे कासचे पर्यटन क्षेत्र भविष्यात धोक्यात येण्याची शक्यता आहे.ड्रग्स माफिया, अनधिकृत व्यावसायिक यांची या परिसरात मिलीभगत होत असल्याने हा परिसर भविष्यात अशांततेचे केंद्र होऊ नये म्हणून सातारकरांनी उठा, संघटित व्हा सातारचे वैभव असलेले कास पठार व निसर्ग सौंदर्य जपुया हा निर्धार आपण वेळीच केला नाही, तर भविष्यातील पिढी आपल्याला माफ करणार नाही हे तितकेच खरे.
निसर्गाची वाताहातच होईल
कास पठार व परिसराला धनिकांचा विळखा पडला आहे.भविष्यात यामुळे निसर्गाची वाताहत होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत.असे निसर्गतज्ज्ञांचे मत आहे.परिसरातील दुर्मिळ वनऔषधी व वृक्ष हे व्यवसायासाठी नष्ट केले जात आहेत.अनेक प्रजाती व वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे.मोठ्या प्रमाणात परिसरात होणारी वृक्षतोड पाहता परिसरातील जंगलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.धनिकांच्या विळख्यात सापडलेले कासचे निसर्ग सौंदर्य भविष्यात टिकणार की नाही, अशी शंका आता येऊ लागली आहे.






