Photo Credit - Social Media
बारामती: राज्यात प्रचारसभांचा जोर वाढू लागला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नागपूरमधून महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडला, तर भारतीय जनता पक्षानेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही प्रचारात उतरवले. मुख्यमंत्री योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं, विधानसभेतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदीदेखील आज महाराष्ट्रात प्रचारसभा घेणार आहेत.धुळे जिल्ह्यातील गोशाळा मैदानावर होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पण महायुतीतीत घटक पक्षांमध्ये मात्र वेगळचं काहीतरी सुरू असल्याचे दिसत आहे. महायुतीत अजित पवार यांनी आपला सूर बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विधानसभेच्या निकालानंतर राज्यातील सत्तासमीकरणे बदलू शकतात, असा दावा अजित पवारांच्या जवळच्या आमदारांकडून केला जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात उलथापालथ होण्याचे संकेतही दिले जात आहेत. त्यामुळे महायुतीची धाकधूक वाढू लागली आहे.
हेही वाचा: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी घसरून 84.37 च्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर
दरम्यान, युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल केलेल्या बटेंगे तो कटेंगे या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पण अजित पवार यांनी मात्र त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. राज्याच्या बाहेरचे लोक येऊन अशी विधाने करत असतात. पण आपल्या महाराष्ट्राती लोकांनी कायम सौहार्द जपलं आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
तर अजित पवार गटाचे नेत नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला होता. तरीही भाजपचा विरोध डावलून अजित पवारांनी नवाब मलिकांना तिकीट दिले. तर मानखुर्दमधून मलिकांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. पण त्यातच खुद्द नवाब मलिक यांनीच निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील सत्ता समीकरणे बदलू शकतात, असे संकेत दिले आहेत.
हेही वाचा: “वीज पुरवठा खंडीत करु…”; अदानी समूहाची बांग्लादेशाला धमकी, नेमकं प्रकरण काय?
दुसरीकडे बारामतीतही अजित पवारांचा सूर वेगळाच दिसत आहे. नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते आज धुळ्यात महायुतीची सभा घेणार आहेत. पण अजित पवार यांच्या वक्तव्याची राज्यात चर्चा रंगू लागली आहे. निवडणुकीमुळे आधीच राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच बारामतीत त्यांना कुणाच्याच रॅली, सभा, प्रचाराची गरज नसल्याचेही समोर आले आहे. उलट मोदींच्या प्रचारसभेची इतर विधानसभा मतदारसंघांना गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.