नागरिकांना सतर्कतेचा इशारा! मुंबईसह 'या' 11 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट (फोटो सौजन्य-X)
Maharashtra Weather Alert News : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील पाण्याची पातळी वाढली आहे आणि काही ठिकाणी मातीही वाहून गेली. त्यामुळे शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पाहत असतानाच राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे शुक्रवारपासून महाराष्ट्रात पुन्हा पाऊस जोर धरणार आहे. अनुकूल वातावरणामुळे मराठवाड्यापासून मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीपर्यंत सोमवारपर्यंत पाऊस पडेल. हवामान विभागाने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, धुळे, नंदुरबार आणि जळगाव वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, शनिवारी राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार आज चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, शनिवारी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथ्याचा संकुल, कोल्हापूर घाटमाथ्याचा संकुल, सातारा घाटमाथ्याचा संकुल, नांदेड, लातूर, धाराशिव किंवा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील तीन दिवस पुण्यात पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. एकीकडे मान्सूनचा राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरु झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र मान्सून सक्रिय आहे. २७ आणि २८ सप्टेंबर रोजी मराठवाडा आणि कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ आणि २९ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, पुणे-मुंबई आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली. दरम्यान, पुण्यात बुधवारी दिवसभरात कमाल 29.6 आणि किमान 20.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
पावसाळी वातावरण पुढील चार-पाच दिवस कायम राहणार आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर सरकारने यापूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसाचा विशेषतः सोयाबीन, तूर, कापूस, पालेभाज्या, संत्रा व मोसंबी इत्यादी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात बनलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या विदर्भासह मध्य भारतात पावसाळी वातावरण आहे.
तसेच अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी पाणी साचले होते. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत चार मिमी पावसाची नोंद करण्यात आली. अनुकूल वातावरण व प्रादेशिक हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता, गुरुवारपासून वरुणराजा आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.