संग्रहित फोटो
वाई : पालिका व नगरपंचायत निवडणुका समविचारी व मित्र पक्षांनासोबत घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कोअर कमिटी करून इच्छुक उमेदवाराची चाचपणी करावी व निवडणुकीच्या कामाला लागावे, अशी सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
मतदार याद्या अद्ययावत करूनच निवडणुका घ्याव्या
शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांनी वाई येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी शिंदे यांनी पत्रकार यांना माहिती दिली. मतदार याद्या अद्ययावत करून नंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
बैठकीला विविध मान्यवरांची उपस्थिती
शशिकांत शिंदे यांनी दिनांक १५ रोजी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेतली. यावेळी निरीक्षक प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ निकम, सांस्कृतिक विभाग राज्य प्रमुख तेजपाल वाघ, वाई विधानसभा अध्यक्ष डॉ. नितीन सावंत, डॉ. सतीश बाबर, ॲड. विजयसिंह पिसाळ, महिला तालुका अध्यक्ष कोमल ताई पोळ, शहर अध्यक्ष संतोष शिंदे, पश्चिम विभाग संघटक प्रविण महांगडे, किशोर सुळके, शिवसेना (उ. बा. ठा) तालुका अध्यक्ष किरण खामकर, शहर अध्यक्ष स्वप्निल भिलारे, ॲड.निलेश डेरे, जितेंद्र पिसाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा सरचिटणीस संग्राम कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
सरकारने घेतलेल्या निर्णयावर नाराजी
येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे कसे जायचे, त्यासाठी महाबळेश्वर, पाचगणी पाठोपाठ वाईत प्रमुख पदाधिकाऱ्याची व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी बैठक घेण्यात आली असल्याचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. दिवाळीनंतर सुरवातीला पालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वाई मतदार संघात नेता नसताना केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगली मते मिळाली. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयावर ग्रामीण भागात नाराजी आहे, असंही शिंदे म्हणाले.
पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली जाईल
आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की परिवर्तन अटळ असते, हा निसर्ग नियम असून त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वांना बरोबर घेऊन पूर्ण ताकतीने लढविण्यात येणार आहेत. स्थानिक पातळीवर काँग्रेस, शिवसेना या मित्रपक्षांशी चर्चा करून निवडणुकीची रणनीती आखली जाईल. जिथे शक्य आहे तिथे पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.