Major Accident In Gadchiroli Truck Overturns Near House
गडचिरोलीत मोठा अपघात; घराजवळच उलटला ट्रक, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांनी धाव घेत मदतीचा हात पुढे केला. ट्रक रस्त्यावर आडवा पलटी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. काही वेळासाठी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
गडचिरोलीत मोठा अपघात; घराजवळच उलटला ट्रक, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण (फोटो सौजन्य : गुगल)
Follow Us:
Follow Us:
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली मार्गावर निजाम पेंदाम व मनोज मुजुमदार यांच्या घरासमोरच अचानक ट्रक पलटी झाला. ही घटना सोमवारी (दि. 28) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या अशा अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मरपल्ली येथील निजाम पेंदाम व मनोज मुजुमदार यांची घरे रस्त्यालगत आहेत. या दोन्ही घरातील व्यक्ती सोमवारी सकाळी आपआपल्या कामात व्यस्त होती. दरम्यान, या मार्गावरून भरधाव वेगात जाणारा ट्रक (एमएच 33 / टी- 3611) अचानक पेंदाम व मुजुमदार यांच्या अगदी घराजवळच पलटी झाला. अचानक भलामोठा आवाज झाल्याने नागरिकांचा थरकाप उडाला. सगळेजण पाहण्यासाठी गेले होते तेव्हा त्या ठिकाणी ट्रक पलटी झाला होता. ट्रक जर घरात शिरला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.
दरम्यान, या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांनी धाव घेत मदतीचा हात पुढे केला. ट्रक रस्त्यावर आडवा पलटी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. काही वेळासाठी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
बोलेरो जीप झाली पलटी
दुसऱ्या एका घटनेत, प्रवासी घेऊन भरधाव वेगात निघालेली बोलेरो जीप एटापल्ली नाक्याजवळील एका दुकानासमोर पलटी झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. नशीब बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी सुखरूप बचावले. अपघातावेळी वाहनात खाजगी कंपनीचे कर्मचारी प्रवास करत होते. अपघातात वाहनाच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो वाहन उलटल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला. मोठा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही किरकोळ जखमींना वाहनातून बाहेर काढले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.