कोल्हापूर : सतेज (बंटी) पाटील याला (Satej Patil) आमदार केलं ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, अशा शब्दांत माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांनी सतेज पाटलांवर हल्ला चढवला. राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार शुभारंभात बोलताना महाडिकांच्या निशाण्यावर फक्त सतेज पाटील राहिले. सत्तारुढ आघाडीचे नेते माजी आमदार अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांनीही सतेज पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
महादेवराव महाडिक म्हणाले की, ‘जंगलात एकच वाघ असतो, डरकाळी फोडली की जाग येते. अजून महाडिक मजबूत आहे, कुठंही यायला तयार आहे. घरी असून, पळून जातो माणूस, जे असतं ते खरं सांगावं. बंटी पाटीलला आमदार केलं, ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. विद्यापीठ निवडणुकीत पुतण्या मुन्नाला डावलून बंटी याला संधी दिली. कारण, मी शब्द दिला होता. कारखान्याला काही मंडळी सातत्याने त्रास देत आहेत. कारखान्याची वीज तोडण्यापर्यंत त्रास देण्यात आला. विरोधकांनी गडबड करू नये, वाघाची डरकाळी आली म्हणजे कळेल. आमच्या डोक्यावरच्या टोप्या पिवळ्या आहेत, तुमचं काय पिवळं होईल बघा’.
खासदार धनंजय महाडिक यांनीही सतेज पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शेलक्या शब्दात समाचार घेतला. ‘राजारामच्या निवडणुकीत इतकं लीड द्या की बंटी पाटील यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची तलप नाही आली पाहिजे. ही केवळ राजाराम कारखान्याची निवडणूक नाही तर जिल्ह्यातून दृष्य प्रवृत्ती नष्ट करण्याची वेळ’ आल्याचे ते म्हणाले.
सतेज पाटील हा मनोरुग्ण
सारखंसारखं सांगतो मी पाटील आहे, पाटील आहे. सतेज पाटील हा मनोरुग्ण व्यक्ती आहे. खोटारडा माणूस आहे. सूडबुद्धीने काम करणारा हा महाराष्ट्रातील एकमेव नेता राहिला आहे. सतेज पाटील तुमचे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत होतील, असेही महाडिक म्हणाले.