मंचर : मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालय समोर पुणे नाशिक महामार्गावर अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याजवळून १ लाख ९३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर गावच्या हद्दीत पुणे नाशिक हायवे रस्त्यावर अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती मंचर पोलिसांना समजली असता मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी याबाबत कारवाई करण्याच्या सूचना पोलीस पथकास दिल्या होत्या.
पोलीसांनी घटनास्थळी जात कारवाई केली असता त्या ठिकाणी रामदास दत्तात्रय चिखले (वय ४० रा. मोरवाडी मंचर ता. आंबेगाव मूळ रा. पेठ पारगाव ता. आंबेगाव) व दीपक संभाजी कोद्रे (वय ३३ रा. धायकरवाडा गावठाण मार्केट जवळ गांधी चौक मुंढवा पुणे) त्यांच्या जवळील रिक्षा एम.एच १२ एस के ०२१५ या मधून बेकायदा बिगरपरवाना ९३,५०० रुपयांची देशी विदेशी दारु बॉक्स मिळाले.
दारु व रिक्षा मिळुन १ लाख ९३ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र हिले करत आहेत.