पुण्यात भाजपची ताकद आणखी वाढणार; फुरसुंगीत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश
हडपसर : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत. असे असताना पुण्यात भाजपची ताकद आता वाढणार आहे. भाजपचे मंडल सरचिटणीस संतोष हरपळे यांच्या नेतृत्वात व पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे यांच्या उपस्थितीत शेकडो महिला व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.
फुरसुंगी, उरळी देवाची, संकेत विहार, भेकराईनगर, पावर हाऊस, माजी सरपंच, माजी उपसरपंच पदाधिकाऱ्यांनी परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे फुरसुंगी, उरुळी देवाची मंडल सरचिटणीस संतोष हरपळे यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश केले. पक्ष प्रवेशावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांच्या अडचणी ऐकून घेतल्या.
नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न भाजपकडून गेल्या चार वर्षांपासून केला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे या भागातील भाजपची ताकद निश्चितच वाढली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्ष प्रवेशाचा भारतीय जनता पक्षाला निश्चितच फायदा होईल. भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे व पक्षामार्फत नागरिकांची कामे कशाप्रकारे चालतात याची माहिती जिल्हाध्यक्षांनी आपल्या मनोगतामधून व्यक्त केली.
यावेळी विविध मान्यवरांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संतोष हरपळे यांच्या नेतृत्वाखाली फुरसुंगी उरळी मंडलाच्या विविध पदावर अर्चना राजेंद्र तेलकर यांची महिला आघाडी सरचिटणीसपदी, रेखा युवराज काळे यांची महिला आघाडी उपाध्यक्षपदी, मंगल संजय शिरसाट यांची महिला आघाडी चिटणीसपदी निवड, राणी काकासाहेब नाळे यांची महिला आघाडी विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली. तर गणेश ज्ञानोबा धोंडगे यांची भाजप उपाध्यक्षपदी निवड केली गेली.
ठाकरे गटातूनही अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश
काही दिवसांपूर्वीच, मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला नुकताच मोठा झटका बसला. कारण माजी महापौर दत्ता दळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर जळगाव जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षासाठीही आव्हान निर्माण होणार आहे. या भागातील काही प्रमुख नेते, माजी मंत्री आणि माजी आमदार लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.