संग्रहित फोटो
मुंबई : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. निवडणउकीच्या तोंडावर पक्षप्रवेशही होत आहेत. अशातच आता धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. धाराशीव जिल्ह्यातील नेते अशोक भाऊ जगदाळे यांच्यासह असंख्य नेते व पदाधिकारी यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. अशोक जगदाळे यांच्याबरोबर नळदुर्गचे माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी उपनगराध्यक्ष शरिफ भाई शेख, माजी नगरसेवक अमृत भाऊ पुदाले, माजी नगरसेविका सुमनताई जाधव, संजय बेडगे, ताजोद्दीन सय्यद, रुक्नोदीन शेख, आलीम शेख, दत्ता राठोड, अमोल सुरवसे, नवलकुमार जाधव, माजी नगराध्यक्षा रेखाताई वसंत बागल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून काँग्रेसचा विचार देशाला तारणारा आहे. काँग्रेसचा विचार व राहुल गांधी यांचा संघर्ष यावरचा विश्वास दृढ होत असून, काँग्रेस पक्षाला राज्यात पुन्हा चांगले दिवस येतील.
राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरूच
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे आणि जितेंद्र ननावरे यांनी पक्ष प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळ्यात शहराध्यक्ष योगेश बहल, महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, माजी नगरसेवक नाना काटे आणि अजित गव्हाणे उपस्थित होते. चिंचवडमधील अनंत कोऱ्हाळे यांनी पूर्वी चिंचवड विधानसभा प्रमुख म्हणून काम पाहिले असून, तेथील राजकारणात त्यांचा चांगला प्रभाव आहे. तर पिंपरीतील जितेंद्र ननावरे यांनी युवासेनेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्द घडविली असून, त्यांच्या प्रभागात त्यांचे मजबूत जनसंपर्काचे जाळे आहे. त्यामुळे या दोघांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादीसाठी निवडणुकीपूर्वीचा बळकट टप्पा मानला जात आहे.






