मुंबई – मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या बाबतीत सह्याद्री अतिथिगृह येथे शुक्रवारी रात्री बैठक झाली. मात्र, या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चकार शब्दही काढण्यात आला नाही. बैठकीला उपस्थित असणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी आम्हाला बोलू दिले नाही. त्यामुळे सरकारने छत्रपती संभाजीराजे यांनाही मॅनेज केल्याचे दिसत आहे, असा गंभीर आरोप मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला.
सह्याद्री अतिथिगृहातील बैठकीला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अर्जुन खोतकर, संभाजीराजे छत्रपती, नरेंद्र पाटील, मराठा मोर्चाचे आबासाहेब पाटील, मराठा आरक्षण कार्यकर्ते विनोद पाटील यांच्यासह विविध संघटना आणि मराठा समन्वयक उपस्थित होते.
बैठकीनंतर मराठा समन्वयकांनी पत्रकार परिषद घेत छत्रपती संभाजीराजेंवर गंभीर आरोप केले. समन्वयक म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच आम्हाला सांगितले की, कोणीही मध्ये काही बोलल्यास मी निघून जाईल. त्यामुळे ही बैठक मॅनेज केल्यासारखी दिसत होती. बैठक मराठा आरक्षणासाठी बोलावली होती, पण आरक्षणावर एका वाक्याचीही चर्चा झाली नाही.
बैठकीबाबत शिवछत्रपती संघटनेचे नेते अमर देशमुख यांनी आपला संताप व्यक्त केला. देशमुख म्हणाले, माजी मुख्यमंत्र्यांना जसे बडव्यांनी घेरले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही बडव्यांनी घेरले आहे. मराठा समाजाच्या प्रश्नासंबंधी बैठक बोलवली होती. त्यामुळे सर्वांना बोलू द्यायला हवे होते. मात्र, कालच्या बैठकीत केवळ पहिल्या फळीतील लोकांना आणि त्यातूनही भाजपाशी जवळीक असणाऱ्या नेत्यांनाच बोलण्याची संधी देण्यात आली. इतरांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली.