
Top Marathi News Today Live:
Marathi Breaking news live updates : सातारा जिल्ह्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या प्रशांत बनकरला अटक करण्यात आली आहे. फलटण पोलिसांनी या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक आणि प्रशांत बनकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर दोघेही फरार होते, मात्र अखेर प्रशांत बनकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आत्महत्येपूर्वी डॉक्टरने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये या दोघांची नावे नमूद केली होती. त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळासोबतच बलात्काराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांकडून आता दुसऱ्या आरोपीच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू आहे.
25 Oct 2025 06:40 PM (IST)
अंबरनाथ: सेना भाजपात एकमेकांचे पदाधिकारी फोडण्याची स्पर्धा काही थांबत नसल्याचे दिसून येत आहे.महायुतीतील मित्र पक्षांनी विरोधकांचे पदाधिकारी फोडून कोंडी करण्यापेक्षा मित्र पक्षांचेच पदाधिकारी फोडाफोडीला जोमाने सुरुवात केली आहे. शिवसेनेचे मोहन पुरम परिसरातील पदाधिकारी दुर्गेश चव्हाण आणि रॉयल पार्क परिसरातील पदाधिकारी सचिन गुंजाळ यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतून (शिंदे गट) थेट भाजपात प्रवेश केला आहे. या घडामोडींमुळे शहरात भाजपा स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
25 Oct 2025 06:19 PM (IST)
मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आणि चार वेळा आमदार राहिलेले संजय शिरसाट यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. “मी चार टर्म आमदार राहिलो, पुढे राहीन की नाही माहीत नाही,” असे त्यांनी सांगितले. राजकारणात कधी थांबावे हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
25 Oct 2025 05:54 PM (IST)
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सिडनी येथील क्रिकेट ग्राऊंडवर तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला गेला. पहीले दोन सामने गमावणाऱ्या भारताने जोरदार मुसंडी मारत ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने पराभव केला. या मालिकेत सलग दोन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर, विराट कोहलीची बॅट सिडनी सामन्यात चांगलीच तळपली. त्याने ८१ चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा महान कुमार संगकाराला मागे टाकत मैलाचा दगड गाठला आहे.
25 Oct 2025 05:26 PM (IST)
नुकतेच कावासाकीने त्यांच्या मध्यम वजनाच्या नेकेड बाईक लाइनअपमध्ये एक नवीन मॉडेल, 2026 Z650 S जोडले आहे. ही बाईक सध्या स्टॅंडर्ड Z650 सोबत विकली जाईल, परंतु डिझाइन आणि फीचर्समध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल आहेत. 2026 Kawasaki Z650 S ची किंमत ब्रिटनमध्ये £7,199 (सुमारे 8.42 लाख रुपये) पासून सुरू होते. ही बाईक तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. Z650 S ही स्टँडर्ड Z650 ला रिप्लेस करेल की दोन्ही मॉडेल काही काळ एकत्र विकले जातील याबाबत कंपनीने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही.
25 Oct 2025 05:04 PM (IST)
बॉलीवूड आणि टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह (Satish Shah) यांचे शनिवारी निधन झाले. ते दीर्घकाळापासून मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंजत होते. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० वाजता वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपटांमध्ये काम केले. तथापि, “साराभाई विरुद्ध साराभाई” या टीव्ही शोमध्ये इंद्रवदन साराभाई, ज्याला इंदू म्हणूनही ओळखले जाते, या भूमिकेमुळे ते घराघरात लोकप्रिय झाले. या कॉमेडी शोमध्ये सतीश यांचा अभिनय उल्लेखनीय होता. आजही या शोच्या क्लिप्स इंस्टाग्रामवर व्हायरल होतात.
25 Oct 2025 04:55 PM (IST)
अनेक चर्चांनंतर आणि अडथळ्यांनंतर अखेर वैभव खेडेकरांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला आहे. पक्षप्रवेशानंतर त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवत स्पष्ट इशारा दिला की, “खेडमधील रस्ता रुंदीकरणाचं काम योग्य पद्धतीने झालं नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात फटाके वाजवून आंदोलन केलं जाईल.” खेडेकर म्हणाले, “मी भाजपमध्ये गेल्यानंतर पक्ष मजबूत होईल आणि काहींचं नुकसान होईल, या भीतीमुळे माझा प्रवेश दोन वेळा थांबवण्यात आला. पण हीच माझ्या कामाची खरी पोचपावती आहे.” यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका करत म्हटलं, “तुम्ही मला नाकारलंत, पण मी तुम्हाला नाकारलेलं नाही.” आगामी काळात भाजप घराघरात पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
25 Oct 2025 04:50 PM (IST)
नुकतेच छट पूजेच्या पार्श्वभूमीवर हे कोर्टाने आदेश दिले आहेत. यामध्ये नदी आणि तलावाच्या पाण्यात छट पूजा करू नये कृत्रिम तलावात करावी असे नियम काढण्यात आले आहेत. यामध्ये विविध शर्ती देखील आहेत. परंतु, छट पूजा ही वाहत्या पाण्यात असावी तसेच वसई विरार मध्ये गेल्या 30 वर्षांपासून सतत छट पूजा साजरी केली जात आहे. परंतु, यंदाच्या वर्षी असे आदेश आल्याने नागरिक आक्रमक झाले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची मूर्ती विसर्जन होत नाही यामुळे प्रदूषण होण्याची शक्यता नाही तसेच यामुळे आस्था आणि भावना दुखल्या जात असे नागरिकांचं म्हणणं आहे. जरी कोर्टाने आदेश दिले असले तरी छट पूजे नेहेमी सारखी आहे तिथेच साजरी होण्याचा इशारा बिहारी नागरिकांनी दिला. याबाबत चर्चा करण्यासाठी आणि मागणी करण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या कडे नागरिकांनी धाव घेतली.
25 Oct 2025 04:40 PM (IST)
अहिल्यानगर शहरातील सहा नामांकित डॉक्टरांविरुद्ध तब्बल ५ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूक, कटकारस्थान आणि रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. साध्या घशाच्या त्रासासाठी दाखल झालेल्या ७९ वर्षीय वृद्धाला, कोरोना पॉझिटिव्ह नसतानाही खोटे रिपोर्ट बनवून, चुकीचे उपचार देऊन मारल्याचा आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप फिर्यादी अशोक खोकराळे यांनी केला आहे.
25 Oct 2025 04:40 PM (IST)
सोलापूर जिल्ह्यातील कोरफळे गावात घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. किरण बर्डे या परिश्रमी शेतकऱ्याच्या द्राक्षबागेवर अज्ञात इसमाने तणनाशक फवारल्याने संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक नष्ट झाल्याने बर्डे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलं आहे. सुमारे एका एकर द्राक्षबागेवर तणनाशक फवारल्यामुळे 10 ते 11 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
25 Oct 2025 04:30 PM (IST)
लोका सांगे ब्रह्म ज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण या उक्तीचा प्रत्यय केडीएमसीत आला आहे. शहरात अनधिकृतपणे ब’नर्स किंवा होर्डींग लावले जातात. त्या विरोधात केडीएमसी प्रशासनाकडून कारवाई केली जाते. शहराला विद्रूप करणाऱ्यांच्या विरोधात झालीच पाहिजे. मात्र चक्क केडीएमसी जेव्हा हे कृत्य करते. तर इतरांनी काय बोध घ्यावा. केडीएमसीकडून ३० आक्टोबर रोजी कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात केडीएमसीचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. याची माहिती देण्यासाठी केडीएमसीने मुख्यालयासमोर एका विजेच्या पोलवर भला मोठा बॅनर लावला आहे. हा बॅनर केडीएसी आयुक्तांच्या नावाला आहे. आत्ता कारवाई कोण कोणावर करणार असा सवाल उसस्थित केला जाणार आहे. या प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महापालिकेच्या पाेलवर लावला असेल तर त्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही.
25 Oct 2025 04:10 PM (IST)
वेंगुर्ले तालुक्यातील महत्वाच्या आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे. आडेली मतदारसंघातील आडेली, दाभोली, वायंगणी या गावातील बुथप्रमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर दाभोली आणि वायंगणी येथील ठाकरे सेनेच्या सरपंच यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
25 Oct 2025 04:00 PM (IST)
निवडणूक लढविण्याबाबत आमचा निर्णय झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढविल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी राजकीय पक्ष त्या मूडमध्ये गेले आहेत. फक्त पत्रकारच अजून त्या मूडमध्ये नाहीत. आम्ही प्रत्येक जण स्वबळावर निवडणुका लढण्याचा तयारीला लागलेले आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन्ही पक्षांची तुल्यबळ ताकद आहे. शिवसेना-भाजपमध्ये युती करून आम्ही बंडखोरीला का प्रोत्साहन देऊ ? उबाठाकडे निवडणुका लढविण्यासाठी उमेदवारच नाहीत. महाविकास आघाडीची उमेदवार उभे करण्याची क्षमता नाही. त्यामुळे महायुती मैत्रीपूर्ण निवडणूक लढवेल आणि निवडणुकीनंतर एकत्र सत्ता स्थापन करेल. दोन्ही पक्षांची स्वबळाची तयारी आहे. त्यामुळे आम्ही कामाला लागलो आहोत, असे वक्तव्य पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
25 Oct 2025 03:57 PM (IST)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने पराभव करून मालिकेचा शेवट गोड केला आहे.
25 Oct 2025 03:48 PM (IST)
मुंबई: ग्लॅमर वर्ल्डमध्ये स्टारडम मिळवणे आणि ते दीर्घकाळ टिकवून ठेवणे सोपे नसते. अनेक कलाकार काही विशिष्ट कारणांमुळे अभिनय क्षेत्रातून बाहेर पडतात. यामध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी करिअरच्या ऐन शिखरावर असताना धर्माची वाट निवडली आणि अभिनयाला कायमचा रामराम ठोकला.
25 Oct 2025 03:41 PM (IST)
“बॉलीवूड अभिनेता परेश रावलहे यंदा ‘हेरा फेरी 3’ मुळे खूप चर्चेत होतं. त्यांनी आधी हा सिनेमा सोडला होता, पण नंतर मोठा गदारोळ झाला, वाद झाला तेव्हा त्यांनी परत चित्रपटात काम करण्यास होकार दिला. परेश रावल यांनी विनोदी, खलनायक आणि सहाय्यक अशा विविध भूमिका साकारल्या आहेत आणि त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
25 Oct 2025 03:28 PM (IST)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २३७ धावांचा पाठलाग करताना भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक ठोकले आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमधले आपले ३३ वे शतक ठोकले आहे.
25 Oct 2025 03:20 PM (IST)
“मुंबईच्या रस्त्यावर एका मुलीची हत्या केली जाते. अशा घटना राज्यात सातत्याने घडत आहेत. वसई, मराठवाड्यात या घटना घडत आहेत. अत्यंत असंवेदनशीलपणे गृहखाते काम करत आहे. गृह खातं विरोधकांवर पाळत ठेवणं, विरोधकांचे फोन टॅप करणे, पोलिसांना विरोधकांच्या मागे लावणं, राज्यातील पोलिस व्यवस्था कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी असते.
25 Oct 2025 03:09 PM (IST)
ऑस्ट्रेलियन फलंदाज अॅलेक्स केरी आणि मॅट रेनशॉ क्रीजवर असताना ही घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियाचे धावफलकावर १८३ धावा लागलेल्या होत्या, दरम्यान, हर्षित राणाच्या चेंडूवर केरीने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला खरा पण चेंडू हवेत उंच उडाला आणि श्रेयस अय्यरने एक शानदार झेल घेण्यासाठी मागे धाव घेण्याचा प्रयत्न केला.
25 Oct 2025 03:00 PM (IST)
साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली. आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला, चुकीचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी वरिष्ठ आणि राजकीय दबाव आल्याचा आरोपही तिने सुसाईड नोटमध्ये केला होता. त्यासाठी एका खासदाराच्या दोन पीएंनी दबाव टाकल्याचा आरोपही तिने सुसाईड नोटमध्ये केला होता.
25 Oct 2025 02:50 PM (IST)
जम्मू काश्मीरमध्ये नुकतेच राज्यसभेची निवडणूक पार पडली. दरम्यान राज्यसभा निवडणुकीत आलेल्या निकालाने खळबळ उडाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये 4 जागांवर निवडणूक पार पडली. दरम्यान 4 पैकी 3 जागा नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने जिंकल्या आहेत. तर एक जागा भाजपने जिंकली आहे. दरम्यान या निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याची शक्यता आहे.
25 Oct 2025 02:45 PM (IST)
दिवाळी सणाला सगळ्यांची खूप जास्त धावपळ होते. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, पाहुणे मंडळींच्या स्वागतामध्ये संपूर्ण वेळ निघून जातो.याशिवाय दिवसभर काम करत राहिल्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आरोग्यासोबतच चेहऱ्याकडे जास्त लक्ष दिले जात नाही. पण या सगळ्याचा थकवा दिवाळी झाल्यानंतर चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली वाढलेली काळी वर्तुळ, चेहऱ्यावरील पिंपल्स, ऍक्ने, फोड इत्यादी अनेक समस्यांमुळे त्वचा निस्तेज आणि काळवंडल्यासारखी वाटू लागते. चेहऱ्यावर वाढलेला थकवा कमी करण्यासाठी महिला वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्याऐवजी त्वचा आणखीनच निस्तेज होऊन जाते
25 Oct 2025 02:40 PM (IST)
Apple अलीकडेच त्यांची आयफोन 17 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमधील iPhone 17 Pro Max हे मॉडेल कंपनीने भगव्या रंगात म्हणजेच Cosmic Orange रंगात लाँच केले होते. कंपनीने पहिल्यांदाच अशा रंगात त्यांचा आयफोन लाँच केला आहे. जेव्हा कंपनीने हे मॉडेल लाँच केले, तेव्हा या रंगाबाबत युजर्समध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र आता या मॉडेलबाबत एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. सध्या सोशल मीडियावर iPhone 17 Pro Max बाबत अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. या पोस्टमध्ये iPhone 17 Pro Max चा भगव्या रंगाचा मॉडेल गुलाबी रंगात बदलल्याचे दिसत आहे.
25 Oct 2025 02:35 PM (IST)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या जड आयात शुल्काचा परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या काही वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे सप्टेंबरमध्येही किरकोळ महागाई उच्च राहिली. अमेरिकेच्या कामगार विभागाने शुक्रवारी मासिक महागाईचा डेटा जाहीर केला. आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये ग्राहकांच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढल्या, तर त्याच वर्षी ऑगस्टमध्ये ग्राहकांच्या किमती २.९ टक्क्यांनी वाढल्या होत्या. अन्न आणि ऊर्जा श्रेणीतील चढउतारांव्यतिरिक्त, मुख्य महागाई ३ टक्क्यांवर राहिली जी ऑगस्ट महिन्यातील ३.१ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
25 Oct 2025 02:30 PM (IST)
“भारतीय जेवणात विविध प्रकारच्या रोट्या, पराठे आणि भाकऱ्या आढळतात. पण त्यापैकी एक खास आणि रेस्टॉरंट-स्टाईल रोटी म्हणजे रुमाली रोटी. नावाप्रमाणेच ही रोटी अतिशय पातळ, मऊ आणि लवचिक असते अगदी रुमालासारखी! म्हणूनच तिला “रुमाली रोटी” म्हणतात. उत्तर भारतातील मुगलई आणि पंजाबी पदार्थांसोबत ही रोटी सर्व्ह केली जाते, विशेषतः बटर चिकन, पनीर बटर मसाला, किंवा कोरमा सारख्या रिच ग्रेव्ही डिशेससोबत.
25 Oct 2025 02:25 PM (IST)
पंचांगानुसार, बुध ग्रह 24 ऑक्टोबर रोजी तूळ राशीतून बाहेर पडला आहे आणि मंगळाच्या अधिपत्याखाली वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. बुध हा ग्रहांचा राजा आहे आणि बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर प्रभाव पाडणारा सक्रिय ग्रह आहे. तर मंगळ हा ग्रहांचा सेनापती आहे आणि ऊर्जा, धैर्य, शक्ती आणि दृढनिश्चयाला प्रोत्साहन देणारा ग्रह आहे.
25 Oct 2025 02:20 PM (IST)
राज्यासह देशभरातील गुन्हेगारी थांबताना दिसत नाही. दररोज खून, हाणामाऱ्या, लुटमार, धमकावणे अशा घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात असले तरीही घटना थांबताना दिसत नाही. अशातच आता भोसरीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 18 वर्षीय विद्यार्थ्याला ओळखीच्या तिघांनी रॉड व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
25 Oct 2025 02:15 PM (IST)
काबूल/इस्लामाबाद : गेले दोन आठवड्यांपासून पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमधील (Afghanistan) सीमा तणाव सतत वाढत होता. दरम्यान हा तणाव कमी करण्यासाठी आता महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी करार लागू करण्यात आला असून त्यांवरील वाटाघाटीसाठी चर्चा सुरु आहे.
25 Oct 2025 02:10 PM (IST)
या पर्यटन स्थळी दिवाळी हंगाम हा वर्षातील पर्यटन हंगामातील महत्वाचा हंगाम समजला जातो. या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असून माथेरान मधील मागील दीड महिना थंड असलेला पर्यटन हंगाम पुन्हा जोरात सुरू झाला आहे.मात्र नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन सुरू झाली नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत.दरम्यान मिनी ट्रेन मार्गातील बहुसंख्य दुरुस्तीची कामे पूर्ण होत आल्याने याच पर्यटन हंगाम मिनी ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.
25 Oct 2025 02:05 PM (IST)
विकेंड आला की, अनेकांचा मित्रांसोबत अल्कहोल पिण्याचा प्लॅन होतो. पण दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्याची वेळ आताच दारुची ही नशा आपल्याला बेधुंद करुन सोडते. दारुचा हा हँगओव्हर लवकर जाता जात नाही आणि यामुळे डोकेदुखी, मळमळ, चक्कर होणे अशा समस्या भेडसावू लागतात. या समस्या दूर करण्यासाठी कोणत्या औषधाची गरज नाही तर तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर करुन अल्कहोलचा हँगओव्हर काही वेळातच उतरवू शकता.
25 Oct 2025 02:00 PM (IST)
अमेरिका आणि व्हेनेझुएलामधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देश आता युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. पेंटागॉनने लॅटिन अमेरिकेत १०,००० सैन्य आणि 12 विमानवाहू जहाजे आणि युद्धनौका तैनात केल्यामुळे युद्धाचा भय आणखी वाढला आहे. पेंटागॉनच्या या तैनातीने कराकस येथील राष्ट्रपती राजवाड्यात खळबळ उडाली आहे. प्रत्युत्तरादाखल व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी रशियन शस्त्रे तैनात केली आहेत, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.
25 Oct 2025 01:50 PM (IST)
मराठी टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अक्षया नाईक आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिचा पहिला हिंदी सिनेमा ‘ग्रेटर कलेश’ थेट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेनासा झालाय.हा आनंद व्यक्त केला असून तिने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने सिनेमाच्या स्क्रीनिंगचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत लिहिले:
25 Oct 2025 01:40 PM (IST)
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने त्यांच्या ताज्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन (WEO) अहवालात म्हटले आहे की भारत २०२५-२६ मध्ये ६.६% दराने वाढून जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये राहील. पहिल्या तिमाहीत भारताच्या मजबूत आर्थिक क्रियाकलापांच्या आधारे IMF ने हा वाढीव अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे अमेरिकेने लादलेल्या नवीन आयात शुल्काचा परिणाम मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
25 Oct 2025 01:30 PM (IST)
जागतिक दहशतवाद आणि मनी लॉंडरिंग विरोधी संस्था FATF ने एक मोठी कारवाई केली आहे. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांना ग्रे लिस्टमध्ये टाकले आहे. यामध्ये उत्तर कोरियात, इराण, म्यानमार हे देश ग्रे लिस्टमध्येच आहेत. तर काही देशांना या ग्रे लिस्टमधून काढून टाकण्यात आले आहे. या देशांना FATA ने गंभीर इशारा देखील दिला आहे.
25 Oct 2025 01:28 PM (IST)
टीव्हीची ग्लॅमरस अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. झी टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘कुंडली भाग्य’ मध्ये सृष्टी अरोरा ही भूमिका साकारून घराघरात ओळख मिळवणारी ही अभिनेत्री वादांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरते.कधी तिची धाडसी विधानं चर्चेत येतात, तर कधी सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओ लक्ष वेधून घेतात.
25 Oct 2025 01:20 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील सत्ताधारी 21 आमदारांना एका कंत्राटदराने 21 महागड्या ‘डिफेंडर’ कार गिफ्ट दिल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
25 Oct 2025 01:11 PM (IST)
दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, रांगोळी यांच्याबरोबर याचं महत्वाचं वाटतं ते म्हणजे किल्ला बनवणं. दिवाळीतल किल्ला बनवणं ही देखील एक परंपराच आहे. हीच परंपरा पुढे नेत कर्जतमध्ये रायगड किल्ला आणि व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडळ यांच्या माध्यमातून रांगोळी प्रदर्शन दरवर्षी भरवण्यात येते.या यावर्षी रंगावली प्रदर्शन बरोबर रायगड किल्ला चित्र प्रदर्शन आणि व्यंगचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला कर्जत शहरातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे.
25 Oct 2025 01:05 PM (IST)
महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी फरार आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या आत्महत्यानंतर आरोपी प्रशांत बनकर हा मित्राचा फार्म हाऊसवर लपून बसला होता. पोलिसांनी त्याला तेथून अटक केली.
25 Oct 2025 12:50 PM (IST)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण अद्याप अस्पष्ट. एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यानं चर्चांना उधान आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत ते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे समजते.
25 Oct 2025 12:40 PM (IST)
बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या विजय चव्हाण यांची राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज भेट घेणार आहे.या शिष्टमंडळात मंत्री संजय राठोड, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार अर्जुन खोतकर यांचा समावेश आहे. विजय चव्हाण जालन्यात उपोषणाला बसले आहेत.
25 Oct 2025 12:30 PM (IST)
मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होईल, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.मुंबईमध्ये आणि ठाण्यात महायुतीचा पराभव स्पष्ट दिसत आहे, असे राऊत यांनी पत्रकारांना सांगितले.
25 Oct 2025 12:19 PM (IST)
सातारा फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आरोपी पीएसआय गोपाळ बदने यांच शेवटचं मोबाईल लोकेशन पंढरपूर असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.पोलिसांना हि माहिती मिळताच बदनेचा शोध सुरू केला आहे. पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी बदनेच्या शोधासाठी एक टीम तैनात केली आहे.पण अद्याप तो पोलिसांना गुंगारा देत आहे.
25 Oct 2025 12:00 PM (IST)
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठे कारवाई करण्यात आली आहे. एक महिला प्रवासी वन्यप्राण्यांची तस्करी करताना सापडली आहे. याअंतर्गत सीमाशुल्क विभागाने ठाणे येथील एका महिला प्रवाशाला अटक करण्यात आली. आरोपीकडे १५४ विदेशी वन्यप्राणी सापडले असून, या कारवाईत ॲनाकोंडा, सरडे, कासवासह १५४ प्राणी ताब्यात घेण्यात आले. या सर्व प्राण्यांना मूळ देशात पाठवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. संबंधित महिला प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिला अटक केली. महिलेच्या सामानाची तपासणी केली असता त्यात वन्यप्राणी लपवल्याचे आढळले.
25 Oct 2025 11:55 AM (IST)
देशात सायबर फ्रॉडच्या घटना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत असते. वेगवेगळ्या जाहिराती, सायबर फॉर्डबाबत जनजागृती अशा विविध माध्यमातून लोकांना सावध करण्यासाठी प्रयत्न केले जातात. आता या सायबर फ्रॉडना आळा घालण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने एक नवा नियम जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम सर्व मोठे टेलिकॉम ऑपरेटर्स जसे की एअरटेल रिलायन्स जिओ बीएसएनएल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्यांना लागू होणार आहे.
25 Oct 2025 11:50 AM (IST)
Garmin Venu X1 चे भारतात लॉन्चिंग झाले आहे. या नव्या प्रीमियम स्मार्टवॉचमध्ये २-इंच टचस्कीरम एमोलेड डिस्प्ले आणि चालू मोड आणि बिल्ट-इन ईलडी फ्लॅशलाइट आहे. Garmin Venu X1 मध्ये ८ मिमी वॉच केस आहे. तसेच हे स्मार्टवॉच एकदा चार्चजिंग केल्यावर ८ दिवसांपर्यंत टिकू शकते.
25 Oct 2025 11:45 AM (IST)
बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. आज जगभरात असे अनेक देश आहेत जिथे बुद्धांच्या मोठ्या मूर्ती उभारल्या जातात आणि देव म्हणून त्यांची पूजा केली जाते. भारतातही अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननात गौतम बुद्धांच्या मुर्तींचे अवशेष सापडले आहेत. भारतात सांची (मध्य प्रदेश) येथे १–३ शतकातले बौद्ध स्तूप व बुद्धाच्या विविध मूर्त्या आढळल्या आहेत.
25 Oct 2025 11:40 AM (IST)
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवार, २६ ऑक्टोबर रोजी माटुंगा आणि मुलुंड दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मुख्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
25 Oct 2025 11:35 AM (IST)
राज्यात येणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना आता कठोरपणे आळा बसणार आहे. घुसखोरी रोखण्यासाठी फडणवीस सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, बांगलादेशी घुसखोरांची ‘ब्लॅकलिस्ट’ तयार करण्याचे आणि त्यांच्या रेशनकार्डची पडताळणी करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. तसेच, नवीन शिधापत्रिका (रेशनकार्ड) वितरणासाठी नव्या मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. या संदर्भात शासनाने जारी केलेल्या महत्त्वाच्या निर्णयानुसार (GR) खालील सूचना देण्यात आल्या आहेत.
25 Oct 2025 11:30 AM (IST)
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर शाखेने (Cyber Wing) ऑनलाइन गुंतवणूक फसवणुकीबाबत नुकताच एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, गेल्या सहा महिन्यांत भारतातील ३०,००० हून अधिक लोकांची गुंतवणूक फसवणुकीच्या नावाखाली १,५०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या घोटाळ्यात बळी पडलेल्यांपैकी ६५ टक्के प्रकरणे एकट्या बंगळूरू, दिल्ली-एनसीआर आणि हैदराबादमध्ये घडली आहेत.
25 Oct 2025 11:25 AM (IST)
फलटण येथील तरुण डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी प्रशांत बनकर याला अटक केली आहे. सातारा ग्रामीण पोलिसांनी आज शनिवार (२५ ऑक्टोबर) पहाटे सुमारे चार वाजता ही कारवाई केली. फलटण पोलिसांनी या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक आणि प्रशांत बनकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर दोघेही फरार होते, मात्र अखेर प्रशांत बनकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
25 Oct 2025 11:20 AM (IST)
शनिवारी (२५ ऑक्टोबर) जपान भूकंपाच्या धक्क्याने हादरला. जपानच्या होक्काइडो येथे ५.७ तीव्रतेचा भूकंप झाला. सुदैवाने या भूकंपात कोणत्याही जीवितहानी किंवा वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही. परंतु आणखी एकदा भूकंपाच्या जोरदार झटकाच्या इशारा देण्यात आला आहे. होक्काइडो हे जपानचे दुसरे सर्वात मोठे बेट आहे.