Top Marathi News Today Live
Marathi Breaking News Updates : ओमराजे निंबाळकर समर्थकांकडून पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर धाराशिव बंदची हाक देण्यात आली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केल्याचा निकाल दिल्यानंतर जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून माफीचा साक्षीदार विश्वसनीय नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून अनेक नेतेमंडळी बाहेर पडताना दिसत आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर शिवसेना शिंदे गटाच्या वर्धापन दिन मेळाव्यात जोरदार टीका करत पक्षातील आणखी मोठ्या फुटीचे संकेत दिले आहेत.
मुंबईतील २५ माजी नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा करताना २०२९ पर्यंत एकही आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिल्लक राहणार नसल्याचा दावा कदम यांनी केला. रामदास कदम यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, संजय राऊतांना आम्ही गांभिर्याने घेत नाही. तुम्ही ‘ऑपरेशन तुडवा’ असे म्हणाले, पण आम्ही शिवसैनिक आहोत, आमच्या अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी संजय राऊतांना दिला.
दरम्यान, तुडवायची भाषा कुणाला करताय, हिंमत असेल तर खासदारांच्या केसाला धक्का लावून पाहा. तुमच्या घरात शिवसैनिक शिरतील आणि तोंड बंद करतील, फोडून काढतील, असेही रामदास कदम म्हणाले. राऊत तुमचे तोंड सांभाळा, असे कदम म्हणाले.
20 Jun 2026 06:00 PM (IST)
Longest Day on Earth Explainer: पृथ्वीवर सर्वात लहान दिवस २१ डिसेंबर किंवा २२ डिसेंबर रोजी असतो, हे कदाचित तुम्हाला माहितीच असेल. त्या दिवशी कधी सकाळ होऊन रात्र होते, हे समजतच नाही. याउलट, उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात लांब किंवा मोठा दिवस २१ जून रोजी आहे. वर्ष २०२६ मध्ये २१ जून, रविवारी पृथ्वीवरील उत्तर गोलार्धातील देशांमध्ये वर्षातील सर्वात मोठा दिवस असेल. भारतासह उत्तर गोलार्धात या दिवशी दिवसाची वेळ सर्वात जास्त आणि रात्र सर्वात लहान असते. या खगोलीय घटनेला ‘ग्रीष्म अयनांत’ (Summer Solstice) म्हटले जाते.
20 Jun 2026 05:50 PM (IST)
Car Stuck In Rain Water: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. यंदाच्या वर्षी पाऊस सुरू झाला नसला तरी तो लवकरच सुरू होण्याचा अंदाज आहे. दरम्यान आज आपण वाहन चालकांसाठी गाडीची पावसाळ्यात कशी काळजी घ्यायची याबाबत जाणून घेऊयात. पावसाळा वाहन चालकांसाठी नवनवीन आव्हाने घेऊन येत असतो. मोठ्या शनरांमध्ये (Automobile) थोडासा पाऊस झाला तरी लगेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. आज आपण पाण्यामध्ये गाडी बंद पडल्या कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेऊयात.
20 Jun 2026 05:40 PM (IST)
परभणी जिल्ह्यात मंदिराचा सभा मंडप कोसळून त्या खाली ३० ते ४० भाविक अडकले होते. त्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
20 Jun 2026 05:30 PM (IST)
B.Com Scholarship Schemes 2026: जर तुम्ही वाणिज्य शाखेतून पदवी (B.Com) घेण्याचे स्वप्न पाहत असाल, पण फी भरण्याच्या चिंतेमुळे काय करावे हे समजत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सरकारतर्फे अनेक शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात, ज्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळते.
बहुतांश सरकारी शिष्यवृत्ती योजनांसाठी ‘राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल’ (NSP) द्वारे अर्ज करता येतो. याशिवाय विविध राज्यांनी आपली स्वतंत्र शिष्यवृत्ती पोर्टल्स देखील विकसित केली आहेत.
20 Jun 2026 05:20 PM (IST)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय स्तरावर मोठा फेरबदल करण्यात आला असून, प्रशासनाने तब्बल २७२ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या आणि कामकाजात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने ही व्यापक बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेतील या मोठ्या बदली प्रक्रियेमुळे कर्मचारी वर्गात दिवसभर चर्चांचे वारे वाहत होते. या बदल्यांचा महापालिकेच्या आगामी कामकाजावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
20 Jun 2026 05:10 PM (IST)
kalyan News Marathi : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा पोलीस ठाण्यात जमीन व्यवहाराशी संबंधित कथित फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत शिंदे सेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे कल्याणच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
20 Jun 2026 05:00 PM (IST)
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली असून, अवघ्या दोन आठवड्यांत चित्रपटाने १५ कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा गाठला आहे. झी स्टुडिओजच्या निर्मितीतील आणि विविध कोरगांवकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटाला राज्यभरातील प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुलचे फलक झळकत असून, सोशल मीडियावरही चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
20 Jun 2026 04:57 PM (IST)
NEET UG Re-Exam 2026 Dress Code: नीट यूजी २०२६ च्या फेरपरीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. लाखो विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोहोचणार आहेत, मात्र यंदा केवळ अभ्यासच नाही, तर ‘ड्रेस कोड’चे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ड्रेस कोडचे पालन न केल्यास तपासणीत जास्त वेळ लागू शकतो आणि प्रवेशावरही परिणाम होऊ शकतो, असे एनटीएने (NTA) स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, सुरक्षेसाठी यंदा पहिल्यांदाच परीक्षा केंद्रावरील वेळ एनटीएच्या विशेष भिंतीवरील घड्याळाद्वारे निश्चित केली जाणार आहे. वाचा सविस्तर...
20 Jun 2026 04:47 PM (IST)
सध्या चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये भारत आणि अफगणिस्तान यांच्यात तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना सुरू आहे. अफगणिस्तानच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अफगणिस्तानचा हा निर्णय चुकीचा ठरला. 100 रन्सच्या आतच अफगणिस्तानने 4 विकेट्स गमावल्या. प्रसिद्ध कृष्णाने शानदार गोलंदाजी केली. वाचा सविस्तर...
20 Jun 2026 04:37 PM (IST)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार बंड करून शिंदेसेनेत दाखल होणार आहेत. या घटनेनंतर काही तासांत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे तब्बल १४ ते १५ आमदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या संदर्भात ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते. वाचा सविस्तर...
20 Jun 2026 04:27 PM (IST)
कल्याणमध्ये अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आंबिवली परिसरात सापळा रचून अमली पदार्थ विरोधी पथक आणि खडकपाडा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल 13 लाख 25 हजार रुपये किमतीचे MD ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील ड्रग्स तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर...
20 Jun 2026 04:17 PM (IST)
गुन्हेगारांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत उल्हासनगर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील दोन वाँटेड आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, यामध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. वाचा सविस्तर...
20 Jun 2026 04:10 PM (IST)
सोन्याचे भाव विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. सोनं खरेदी न करण्याच आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. त्यात आपल्याच भारतात सोन्याचा मोठा साठा असल्याची बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील एका बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कुर्नूल जिल्ह्यातील जोन्नागिरी गावात सोन्याचा मोठा साठा सापडला असल्याचं समोर येत आहे. ज्यामुळे येत्या काही वर्षांत हे राज्य देशातील सर्वात मोठे सोन्याचे उत्पादक राज्य बनणार आहे. वाचा सविस्तर...
20 Jun 2026 03:57 PM (IST)
पाकिस्तानमधील (Pakistan News) सुरक्षा यंत्रणा आणि कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण घटना समोर आली आहे. पाकिस्तानचा खैबर पख्तुनख्वा हा प्रांत पुन्हा एकदा रक्ताने माखला असून येथील बन्नू जिल्ह्यात दहशतवाद्यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. शनिवार, २० जून रोजी दहशतवाद्यांनी बन्नू जिल्ह्यातील वझीर उपविभागात एकापाठोपाठ एक दोन अत्यंत शक्तिशाली रिमोट-कंट्रोल बॉम्बस्फोट घडवून आणले. या भीषण आणि अंगावर काटा आणणाऱ्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आतापर्यंत ७ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर ३ जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. या घटनेमुळे संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.
20 Jun 2026 03:47 PM (IST)
टीम इंडिया सध्या अफगाणिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ (Ind vs Eng) इंग्लंडचा दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु, या दौऱ्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाल्यानंतर, हार्दिक इंग्लंड दौऱ्यातूनही बाहेर झाला आहे. तर विराट कोहलीचा इंग्लंड दौराही अद्याप अनिश्चित आहे. कोहलीच्या फिटनेस टेस्टच्या आधारावर पुढील निर्णय घेतला जाईल. वृत्तानुसार, त्याला २२ जून रोजी बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस टेस्ट द्यावी लागेल.
20 Jun 2026 03:35 PM (IST)
पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे राहणारे आणि औद्योगिक क्षेत्रातील वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रदीप जाधव (वय ५७) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृताच्या पत्नी वंदना जाधव यांनी बोईसर पोलिसांकडे तक्रार दाखल करत कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळामुळेच पतीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप केला आहे.
20 Jun 2026 03:22 PM (IST)
यजमान अमेरिकेने फिफा विश्वचषक २०२६ ( FIFA World Cup 2026) च्या ‘ड’ गटात ऑस्ट्रेलियाला २-० ने पराभूत करून आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली. या प्रभावी विजयासह, अमेरिकेच्या संघाने स्पर्धेच्या पुढील फेरीत, म्हणजेच राऊंड ऑफ 32 फेरीत, आपले स्थान निश्चित केले. अमेरिका राऊंड ऑफ 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा दुसरा संघ बनला आहे. सिएटल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात, अमेरिकन खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्या हाफमध्ये दोन गोल करून त्यांनी प्रतिस्पर्धी संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. १९३० नंतर प्रथमच अमेरिकेच्या पुरुष संघाने विश्वचषकाचे सलग दोन सामने जिंकले आहेत.
20 Jun 2026 03:10 PM (IST)
पश्चिम आशियातील इराण युद्ध संपल्यानंतर आता दक्षिण आशियातील बांगलादेशमध्ये (Bangladesh) अल्पसंख्याक हिंदू समाजावरील अत्याचाराचा आणि धार्मिक संघर्षाचा एक नवा भडका उडाला आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथे प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचा झालेला कथित अपमान आणि उत्तर बांगलादेशातील रंगपूर-गायबांधा भागात सुरू असलेल्या भव्य राम मूर्ती प्रकल्पाला कट्टरपंथीय इस्लामी संघटनांच्या धमक्यांमुळे अचानक स्थगिती द्यावी लागल्याच्या निषेधार्थ हजारो हिंदूंनी प्रचंड मोठी निदर्शने केली आहेत. ‘जय श्री राम’ आणि सनातनी एकतेच्या घोषणांनी शुक्रवारी ढाका शहरातील रस्ते आणि चौक दणाणून गेले होते.
20 Jun 2026 02:59 PM (IST)
औष्णिक वीज प्रकल्पांमधून निघणारी राख ही व्यर्थ मानली जायची पण आता तिचा वापर करुन रस्ते बांधकाम, सिमेंट आणि विटांच्या उत्पादनात होत असल्याने, ती गोळा करण्यासाठी वीज प्रकल्पांबाहेर ट्रकच्या रांगा लागत आहेत. आता, रेल्वे मंत्रालय याच राखेपासून लाखो रुपये मिळवण्यासाठी एक भक्कम योजना विकसित करत आहे
20 Jun 2026 02:52 PM (IST)
पवन राजेनिंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आला असून पद्मसिंह पाटील यांच्यासह ९ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. या निकालानंतर आता धाराशीव बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळं शहरात सर्वत्र दुकानं बंद करण्यात येत आहेत.
20 Jun 2026 02:40 PM (IST)
एसटी महामंडळाच्या उत्पन्नात दररोज तीन कोटी रुपयांची वाढ होतेयं. मुंबई परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष कारवाई मोहिमेमुळे एसटीचे उत्पन्न दररोज तीन कोटी रुपयांनी वाढले आहे. एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढला असून गेल्या १५ दिवसांत एसटीच्या उत्पन्नात सुमारे ४४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई करण्यात आली. त्यामुळेच एसटीच्या उत्पनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
20 Jun 2026 02:32 PM (IST)
गणपतीपुळेमध्ये समुद्रात पाच जण बुडाल्याची बातमी समोर येत आहे. संभाजीनगरमधून पर्यटनासाठी आलेले पाच जण बुडाले. पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटक लाटांच्या विळख्यात अडकले आणि पाण्यात बुडाले. सध्या पर्यटकांचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
20 Jun 2026 02:21 PM (IST)
Pavanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्यांअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालं असल्याचं समोर आलं आहे.
20 Jun 2026 02:10 PM (IST)
पवनराजे निंबाळकर हत्ये प्रकरणाचा निकाल दुर्दैवी, हायकोर्टात जाणार असं विधान ओमराजे निंबाळकरांनी केलं आहे. मुंबई पोलिसांवर दबाव होता. तपासात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या असल्याचा आरोप केला आहे. सर्वात आधी मुंबई पोलीस तपास करत होते तपास CBI कडे वर्ग केल्याची मागणी केली होती अशी माहिती ओमराजे निंबाळकर यांनी दिली.
20 Jun 2026 02:00 PM (IST)
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बऱ्याच अनेक कंपन्यांच्या घसरलेल्या शेअर्समुळे बाजारात मोठी खळबळही माजली. पुढील आठवड्यात अशाच घडामोडीची अपेक्षित आहेत. पण असे काही स्टॉक आहेत ज्या स्टॉकनी वेगळीच हवा केली. ४२५ कोटी रुपयांच्या एका मोठ्या सरकारी ऑर्डरमुळे संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी सध्या चांगलीच चर्चेत राहीली आहे. नेमकी कोणती आहे ही डिफेन्स कंपनी आणि शेअर मार्केटमध्ये काय इतका धुरळा करतेय सविस्तर जाणून घेऊयात.
20 Jun 2026 01:55 PM (IST)
गेल्या अनेक महिन्यांपासून रक्तपाताने होरपळणाऱ्या मध्य पूर्वेतून (Middle East) अखेर जगाला दिलासा देणारी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लेबनॉनच्या भूमीवर एकमेकांचे अस्तित्व संपवण्यासाठी लढणाऱ्या इस्रायल आणि हिजबुल्लाह (Israel-Hezbollah War) यांच्यात अखेर अधिकृतपणे युद्धविराम स्थापित झाला आहे. या अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीच्या युद्धविराम करारामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पडद्यामागून अत्यंत आक्रमक आणि थेट भूमिका बजावली आहे. ट्रम्प यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे संपूर्ण मध्य पूर्वेतील युद्धाचे समीकरण एका झटक्यात बदलले असून, या प्रदेशात चिरस्थायी शांतता प्रस्थापित होण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
20 Jun 2026 01:50 PM (IST)
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना आज खेळला जात आहे. हा सामना चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १:३० वाजता सामना सुरु होईल. त्याआधी दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्ताने आपल्या संघात ४ बदल केले आहेत तर भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. प्रसिद्ध कृष्णा, हर्ष दुबे आणि नितीश रेड्डी यांचे अंतिम ११ खेळाडूंमध्ये पुनरागमन झाले आहे.
20 Jun 2026 01:45 PM (IST)
“ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड नामस्मरणात पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी यंदाही सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी ५ हजार ५०० विशेष बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून, राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
20 Jun 2026 01:35 PM (IST)
नॅशनल टेस्टिंग एजन्सी(NTA) कडून आयोजित केल्या जाणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी सरकार पूर्णपणे पाठिंबा देत आहे. तरी एनटीएकडून काही ना काही घटना घडत आहेत. त्यामुळे आता एनटीएच्या प्रणालीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आताचे ताजे प्रकरण महाराष्ट्रातील नागपूरचा रहिवासी असलेल्या ‘अब्दुल्लाह’ नावाच्या विद्यर्थ्यांशी संबंधित आहे, २१ जून रोजी होणाऱ्या NEET UG फेरपरीक्षेसाठी त्याला संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) अबूधाबी येथील परीक्षा केंद्र नेमून देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत भारतात राहून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला थेट परदेशात केंद्र मिळाल्यामुळे एजन्सीच्या कारभारावर आणि केंद्र वाटप प्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
20 Jun 2026 01:30 PM (IST)
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर आज निकाल लागला आहे. 2006 मध्ये झालेल्या पवनराजे हत्या प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्याअभावी न्यायालयाने या प्रकरणात सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केला आहे. या हत्येप्रकरणात माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह आठ आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. २० वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला मोठा धक्क बसला आहे.
20 Jun 2026 01:30 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेले ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी ठरल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला सहाही कथित बंडखोर खासदार गैरहजर राहिल्याने त्यांच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. या घडामोडींनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. यावर घटनेवर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान बनण्याची तयारी करत आहेत. याच कारणामुळे उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी थेट भाजपमध्ये सामील होण्याऐवजी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी दावा केला आहे की, अमित शाह यांना पंतप्रधान बनवण्याची ही एक रणनीती आहे.
20 Jun 2026 01:25 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांच्या अधिकृत विमान ताफ्यात एका अत्यंत भव्य आणि आलिशान विमानाचा समावेश करून संपूर्ण जगाला थक्क केले आहे. ट्रम्प यांनी मॅरीलँडमधील ‘जॉइंट बेस अँड्र्यूज’ (Joint Base Andrews) येथील एका भव्य हँगरमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे नवीन अधिकृत विमान ‘एअर फोर्स वन’ (Air Force One – VC-25B) चे अधिकृत अनावरण केले. बोईंग 747-8 (Boeing 747-8i) मॉडेलवर आधारित असलेले हे महाकाय विमान कतारच्या राजघराण्याकडून (Emir of Qatar) अमेरिकेला भेट म्हणून मिळाले आहे. हे विमान सध्या वापरात असलेल्या ३० वर्षे जुन्या विमानापेक्षा आकाराने दुप्पट आणि अत्याधुनिक सुख-सुविधांनी सज्ज आहे.
20 Jun 2026 01:20 PM (IST)
फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे बनावट व विषारी हातभट्टी दारू सेवनामुळे तब्बल १९ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत गंभीर घटना घडली होती. या भीषण दुर्घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात उमटणार आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार शंकर जगताप यांनी या संवेदनशील प्रकरणावर लक्षवेधी सूचना (लक्षवेधी क्रमांक १) विधानसभेत दाखल केली आहे.
20 Jun 2026 01:15 PM (IST)
भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने पुन्हा एकदा एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. हा रिचार्ज प्लॅन बजेट फ्रेंडली किंमतीत प्रिमियम फायदे ऑफर करणार आहे. कंपनीने त्यांच्या या नव्या रिचार्ज प्लॅनबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट देखील शेअर केली आहे. खरं तर हा नवा रिचार्ज प्लॅन भारतातील खाजगी टेलिकॉम कंपन्या जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार आहे.
20 Jun 2026 01:02 PM (IST)
पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आणि यवत पोलीस ठाण्याने संयुक्त कारवाई करत बेकायदेशीर लिंगनिदान व की स्त्री-भ्रूणहत्या प्रकरणातील मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या कारवाईत केडगाव येथील या पार्थ हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. संगीता पांडुरंग गायकवाड (वय ६१) यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णासाहेब आप्पा गिरी (वय ४३) याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तो कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा अधिकृत परवाना नसताना बोगस डॉक्टर म्हणून हे काम करत होता.
20 Jun 2026 12:48 PM (IST)
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरात मोठी कारवाई करत दोन गांजा तस्करांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल ५७ लाख ७३ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन, रोख रक्कम आणि एक स्कॉर्पिओ वाहनाचा समावेश आहे. याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दगडे करीत आहेत.
20 Jun 2026 12:36 PM (IST)
वैजापूर तालुक्यातील बेलगाव-वैजापूर मार्गावर आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलले असून, स्वतःला साक्षीदार म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्तीच पोलिस तपासात आरोपी म्हणून समोर आली आहे. राजस्थानातील निंबाला गावचा रहिवासी सीताराम छगन बावरी याच्या खूनप्रकरणी ऋषिकेश अजय त्रिभुवन (वय २३, रा. बेलगाव, ता. वैजापूर) आणि राहुल पप्पू कुंभारकर (वय १८, पोटे गल्ली, वैजापूर) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १५ जूनच्या रात्री १२ वाजण्याच्या सुमारास बेलगाव रस्त्यावर तिघे एकमेकांसमोर आले. तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते. सीताराम कथितपणे शिवीगाळ करत होता. त्यावेळी ऋषिकेशला त्या शिव्या आपल्यालाच उद्देशून दिल्या जात असल्याचा संशय आला. काही क्षणांतच शाब्दिक वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले.
20 Jun 2026 12:24 PM (IST)
प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ (पुरंदर) प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांच्या महसुली, न्यायिक आणि अर्धन्यायिक स्वरूपाच्या प्रलंबित अडचणी सोडवण्यासाठी येत्या २२ जून रोजी सकाळी ११ वाजता सासवड येथील प्रांत कार्यालयात एका विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कॅम्पमध्ये शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन जागेवरच निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
20 Jun 2026 12:12 PM (IST)
मैत्रीणीच्या कारणातून मित्रानेच मित्राचा आपल्या साथीदारांना सोबत घेऊन लाकडी दांडके, बॅटने मारहाण करून खून केल्याची घटना गोखलेनगर येथे घडली आहे. याप्रकरणी, चतुःश्रृंगी पोलिसांनी तिघा आरोपींना नवी मुंबई येथील रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बारा तासाच्या आत ताब्यात घेतले आहे. हर्षद मच्छींद्र जाधव (वय. २० ,रा. शकुंतला गार्डन शेजारी गोखलेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अभिषेक संतोष पवार (वय. २०), प्रथमेश धोत्रे (वय. २१) आणि मारुती देवकर (वय. २८, तिघे राहणार जनवडी) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना रात्री अडीच वाजताच्या सुमारास एकतानगर सोसायटी भगवान चाळ गोखलेनगर येथे घडली आहे. याबाबत हर्षद याची आई पोर्णिमा जाधव (वय. ४०) यांनी फिर्याद दिली आहे.
20 Jun 2026 11:40 AM (IST)
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे काही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र, हे फोटो बनावट आणि मॉर्फ केलेले असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. फोटोशॉपद्वारे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे त्यांच्या मित्राच्या मुलीसोबतचे फोटो मॉर्फ करून बदनामी करण्यात आली आहे. नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.
20 Jun 2026 11:31 AM (IST)
मंत्री शिरसाट म्हणाले, सहा महिन्यांपूर्वीच ‘ऑपरेशन टायगर’च्या बातम्या येत होत्या. तेव्हा पक्ष सावध का झाला नाही ? इतके माहित असूनही पदाधिकाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न कोणी का केला नाही. ? राऊत हे हातात कुलूप घेऊनच बसले आहेत. ते पक्षाला कुलूप लावून कधी पळून जातील हेही कळणार नाही असा टोलाही शिरसाट यांनी लगावला. ते भविष्यात पुन्हा खासदार होणार नाही, असे भाष्यही त्यांनी केले.
20 Jun 2026 11:10 AM (IST)
गुरुवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सोशल मिडियावर एका रुग्णालयातील व्हिडिओ वेगाने व्हायरल होऊ लागला. व्हिडिओमध्ये नर्स रुग्णावर उपचार न करता त्याला मारहाण करताना दिसली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समजले की, मुरैना जिल्ह्याच्या एका सरकारी रुग्णालयात हा सर्व प्रकरा घडला आहे. आरोपानुसार, नर्सने रुग्णाला कानशिलात मारली, शिवीगाळ केली आणि इतकंच नाही तर ग्लुकोजची बाटली देखील त्याच्या अंगावर फेकली. या घटनेच्या व्हिडिओ समोर येताच यातील दृष्यांनी यूजर्सना हैराण केलं.
20 Jun 2026 11:07 AM (IST)
यावर्षीच्या नीट पुनर्परीक्षेच्या सुरक्षेतेसाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. सर्व परीक्षा केंद्रे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे (NTA) सुपूर्द करण्यात आली असल्याने परीक्षेच्या दिवशी केंद्रावर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू असेल. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांची जबाबदारी निमलष्करी दलाकडे असेल. तसेच यंदा ५,००० हून अधिक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची नजर असेल.
20 Jun 2026 10:55 AM (IST)
महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा आज तब्बल 20 वर्षांनंतर निकाल लागणार आहे. 2006 मध्ये झालेल्या या हत्याकांडानंतर सुरू झालेला न्यायालयीन प्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान या संवेदनशील खटल्याचा अंतिम निकाल १६ जून रोजी मुंबई सत्र न्यायालयात लागणे अपेक्षित होते. मात्र, “निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज आहे,” असे स्पष्ट करत न्यायधीशांनी हा निकाल पुढे ढकलला होता. आता तब्बल २० वर्षांनंतर हा निकाल आज लागणार आहे.
20 Jun 2026 10:45 AM (IST)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram च्या भारतीय यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन आणि बहुप्रतिक्षित फीचर रोलआऊट केलं आहे. आता यूजर्स पोस्ट शेअर करताना प्रत्येक स्लाईडसाठी वेगवेगळे कॅप्शन्स जोडू शकणार आहेत. हे नवीन अपडेट ‘मल्टिपल कॅप्शन्स ऑन कॅरोसेल’ या नावाने रोलआऊट करण्यात आले आहे. या नवीन फीचरमुळे आता क्रिएटर्स आणि सामान्य यूजर्सचा इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. आता कॅरोसेल पोस्टमधील सर्व स्लाईड्ससाठी यूजर्सना केवळ एकच कॅप्शन शेअर करण्याचा पर्याय होता. मात्र आता यूजर्स नव्या फीचरमुळे पोस्टमधील प्रत्येक स्लाईडसाठी वेगळे कॅप्शन जोडू शकणार आहेत.
20 Jun 2026 10:35 AM (IST)
ब्रिटनची राजधानी लंडनच्या (London) उत्तर भागात एका अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या रेल्वे अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेडफोर्डशायर प्रांताच्या दक्षिण भागात दोन वेगवान प्रवासी गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक बसली. या भीषण रेल्वे अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, ५० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जखमींचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ब्रिटन सरकारने या दुर्घटनेला ‘मोठी राष्ट्रीय आपत्कालीन घटना’ म्हणून घोषित केले असून संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी रवाना केली आहे.
20 Jun 2026 10:25 AM (IST)
NTA च्या अडचणी संपता संपत नव्हत्या तोपर्यंत आता UPSC वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, हे प्रश्न पेपर लीकबाबत नसून EWS कोट्याबाबत आहेत. अनेक निवडलेल्या उमेदवारांच्या आर्थिक परिस्थितीच्या चौकशीत मोठे खुलासे झाले आहेत.
‘द इंडियन एक्सप्रेस’च्या एका अहवालानुसार, संघ लोक सेवा आयोगातर्फे (UPSC) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२५ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) कोट्यातून निवडलेल्या १०४ उमेदवारांपैकी मोठ्या संख्येने असे विद्यार्थी होते, ज्यांनी महागड्या कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी खाजगी शाळांमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे किंवा त्यांचे कुटुंब व्यवसायाशी जोडलेले आहे.
20 Jun 2026 10:15 AM (IST)
पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. फिरण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय तरुण बिझनेसमन यांचा 350 फूट खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबीय आणि मित्रांसोबत किल्ला पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अचानक पाय घसरला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. काही दिवसांतच होणाऱ्या लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
20 Jun 2026 10:05 AM (IST)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटून शिंदेसेनेत दाखल झाले. याची राज्यभर चर्चा सुरु आहे. सहा महिन्यांपूर्वी खासदार फुटणार हे तुम्हाला माहित असूनही तुम्ही काय करत होते? अशी टीका राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली.
20 Jun 2026 09:55 AM (IST)
काँग्रेस नेते राहुल गांधी आज आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अश्यातच, वाराणसीमध्ये युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या अनोख्या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाराणसीमधील राहून गांधींच्या वाढदिवसाच्या सेलेब्रेशनचा व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यात राहुल गांधींचे एक पोस्टर परशुराम अवतारात दाखवण्यात आले आहे. तसेच हातात संविधानाची प्रत घेतलेल्या त्यांच्या पोस्टरवर कार्यकर्ते दुग्धाभिषेक करत आहेत.






