संग्रहित फोटो
बारामती : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीत सत्ताधारी श्री जय भवानी माता पॅनल विरुद्ध विरोधी श्री छत्रपती बचाव पॅनल अशी थेट लढत रंगली असून, प्रचारसभांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली जय भवानी माता पॅनल एकत्र आले असून, त्यांच्या विरोधात अविनाश घोलप, तानाजी थोरात, मुरलीधर निंबाळकर आणि अविनाश मोटे यांनी छत्रपती बचाव पॅनल तयार केले आहे.
कारखान्याचे कार्यक्षेत्र बारामती व इंदापूर तालुक्यांमध्ये असून, दोन्ही ठिकाणी पवार आणि भरणे यांचा प्रभाव मोठा आहे. मात्र, अविनाश घोलप यांची कार्यक्षमता, आणि त्यांचा जनसंपर्क, सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं करत आहे. दरम्यान, विरोधी पॅनलला इंदापूर माजी पंचायत समिती सभापती तुकाराम काळे यांनी पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांच्या आगामी सभा कारखाना क्षेत्रात होत असल्याने राजकीय वजन वाढण्याची शक्यता आहे, परंतु विरोधकांची सशक्त मोर्चेबांधणी देखील दुर्लक्ष करण्यासारखी नाही.
सत्ताधारी पॅनेलमध्ये अंतर्गत नाराजी
जय भवानी माता पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ भवानीनगरमधील भवानी माता मंदिरात पार पडला. या ठिकाणी अजित पवार यांनी नाराज इच्छुकांना समजावत विरोधकर्त्यांना इशारा दिला की, “बाहेरून एक आणि आतून एक” खेळ खपवून घेतला जाणार नाही. दरम्यान, काही विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेत सत्ताधारी पॅनलला पाठिंबा दिला, ज्यामुळे पवार यांना मोठे यश मिळाले. सत्ताधारी पॅनलमध्ये उमेदवारांची गर्दी होती आणि फक्त २१ जागांसाठी अनेक इच्छुक नाराज झाले, यामुळे अंतर्गत नाराजीचे सावट आहे, ज्याचा उपयोग विरोधक करत असल्याचे चित्र आहे.
काराखान्याला अडचणीतून बाहेर काढणार : पवार
अविनाश घोलप यांनी दावा केला की, त्यांच्या कार्यकाळात सभासदांना सर्वाधिक दर २६०१ रुपये आणि कामगारांना उच्चांकी बोनस मिळाला होता, तेव्हा आताचे सत्ताधारी गट हे का देऊ शकले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या निवडणुकीत पृथ्वीराज जाचक यांच्यावर नेतृत्वाची धुरा सोपवली असून, पवार यांनी कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याची ग्वाही दिली आहे. याशिवाय, छत्रपती शिक्षण संस्थेला निवडणुकीनंतर २५ लाखांची मदत जाहीर करून सभासदांमध्ये सकारात्मक संदेश दिला.