गुलाबराव पाटलांची संजय राऊत यांच्यावर टीका (फोटो- यूट्यूब)
मुंबई: सध्या राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. ठाकरे बंधू यांनी एकत्रित यावे यासाठी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते मागणी करत आहेत. जनतेच्या मनात तेच होईल असे पक्षाचे नेते म्हणत आहेत. दरम्यान आज शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटी यांनी तूफान फटकेबाजी केली. त्यांनी ठाकरे गट आणि मनसे युतीवर देखील भाष्य केले आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. त्यामुळे आता सर्व शिवसैनिक एकनाथ शिंदे काय मार्गदर्शन करणार याची वाट पाहत आहेत. आज इकडे आणि तिकडे वर्धापन दिन साजरा होत आहे.”
पुढे बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “माझा जो प्यूअर माल आहे तो संजय राऊत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोणीतरी प्रस्ताव दिला होता की राज ठाकरेंच्या मनसे पक्षाशी युती करा. पण संजय राऊत नावाचे जे कार्ट होत ते म्हटलं, मनसे तर संपलेला पक्ष, याच्याशी काय युती करायची? अन् आता हे मनसेला जवळ या म्हणत आहेत. भावाने भावपाशी आले पाहिजे. विधानसभेत आम्ही यांच्या छाताडावर भगवा फडकवला त्याचप्रमाणे महालिकेवर युतीचा झेंडा फडकणार हे आता त्यांच्या लक्षात आले आहे.”
एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका
खरी शिवसेना आज तुमच्यासमोर आहे. हिंदुत्वाचा भगवा तुमच्याकडे आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण आणि जनतेचा आशीर्वाद आपलयाकडे आहे. हिंदुत्वाचा अंगार म्हणजे शिवसेना, मराठी माणसाचा बुलंद आवाज म्हणजे शिवसेना. शिवसेना म्हणजे शौर्य. शिवसेना म्हणजे स्वाभिमान आणि अभिमान आणि शिवसेना म्हणजे एकजूट होय. शिवसेना म्हणजे आपला प्राण 2024 मध्ये आपण 80 पैकी 60 जागा जिंकल्या. तर उबाठाने 85 पैकी अवघ्या 20 जागा जिंकल्या. आपल्या पक्षाच्या एक तृतीयांश मते त्यांना मिळाली नाही. त्यांनी त्यांच्या जागा कॉँग्रेसच्या व्होट बँकेवर, कॉँग्रेसच्या मेहेरबानीवर जिंकल्या. जनतेने या निवडणुकीमध्ये बिन पाण्याची हजामत करून टाकली. आपलयाकडे आत्मविश्वास तर त्यांच्याकडे अहंकार आहे. अहकांरी लोकांचा फणा 2024 मध्ये जनतेने ठेचला आहे.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी कोणी केली हे जनतेला माहिती आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा घात केला. हिंदुत्वाचा विश्वासघात केला. सरडा रंग बदलतो. मात्र इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा देखील या महाराष्ट्राने पाहीला. मुख्यमंत्रिपदासाठी झाले लाचार ते काय होणार बाळासाहेबांचे वारसदार. हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी मतदानाचा अधिकार गमावला.”