मंत्री मंगल प्रभात लोढा (फोटो- सोशल मीडिया)
गुंडगिरी आणि अवैध बांधकामांवर युद्धपातळीवर कार्यवाहीचे निर्देश
पी उत्तर विभागाचा जनता दरबार संपन्न
अतिक्रमण तातडीने हटवण्याचे लोढांचे निर्देश
मुंबई: कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागाचा जनता दरबार संपन्न झाला. या वेळी स्थानिक आमदार संजय उपाध्याय, विधानपरिषद सदस्य राजन सिंह व संबंधित अधिकारी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांकडून रोहिंग्या बांग्लादेशींची घुसखोरी, गुंडगिरी, मादक पदार्थ सेवन व तळीरामांचा वाढता उपद्रव, सरकारी जागांवर अतिक्रमण, या सारख्या अनेक गंभीर समस्या उपस्थित करण्यात आल्या. या परिसरात १० हजार अवैध बांधकामे आणि घरे असल्याचे एका अहवालाच्या माध्यमातून समोर आले. या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्वतः लक्ष घातले असून या बाबत एक बैठक सुद्धा बोलावण्यात आलेली आहे.
मालवणी परिसरात २० पेक्षा जास्त अंगणवाड्या असून या बहुतांश अंगणवाड्यांवर अतिक्रमण करण्यात आले असल्याची तक्रार नागरिकांनी उपस्थित केली. याबाबत तीव्र नाराजी प्रकट करत पोलीस प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन हे अतिक्रमण हटवावे यासाठीचे निर्देश सुद्धा मंत्री लोढा यांनी दिले. पर्यावरणाच्या दृष्टीने कांदळवन संरक्षण हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि सरकार देखील यासाठी जातीने प्रयत्न करत आहे. असे असताना सुद्धा रोहिंग्या बांग्लादेशींनी कांदळवन तोडून तेथे केलेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष कसे होते असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. या समस्येची दखल घेत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तात्काळ समितीचे गठन करून त्या समितीने परस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. या अहवालाच्या आधारे त्वरित पोलीस प्रशासनाने कारवाई करावी असे देखील त्यांनी सांगितले.
गोरेगावात जनता दरबार! नागरिकांच्या तक्रारींवर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रशासनाला थेट सूचना
मालवणी भागात समाजकटाकांद्वारे एका वृद्ध स्त्री वर आणि तिच्या कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. संबंधित प्रकरणात पोलिसांकडून आरोपींना अजूनही अटक केली गेलेली नाही. आज संध्यकाळपर्यंत जर पोलीस प्रशासनाने आरोपींना अटक केले नाही तर आमदार संजय उपाध्याय यांच्यासह स्वतः यावर मोठी कारवाई करू असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. मादक पदार्थांचे सेवन, तळीरामांचा उपद्रव यासारख्या समस्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मादक पदार्थ सेवन करणारे, तसेच ते पुरवणारे यांचा शोध घेऊन हा प्रकार त्वरित थांबवावा तसेच रात्री उशिरापर्यंत मद्यविक्री करणारे विक्रेते आणि त्यांच्यामुळे नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास लक्षात घेता त्यांचे परवाने १५ दिवसांसाठी रद्द करावे असे देखील असे निर्देश कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पोलिसांना दिले.
“आज समस्या समाधान शिबिरात २०० पेक्षा जास्त तक्रारींचे निवारण केले गेले असले तरी आमचे अजून समाधान झालेले नाही. मालवणी येथील समस्या अतिशय गंभीर आहे त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत” असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.