नवी मुंबई:- नवी मुंबई शहर वसविताना नवी मुंबईतील स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्या १००% जमिनी दिल्या आहेत. असे असताना नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेत गेली अनेक वर्षे काम करीत असलेल्या प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना कायमस्वरूपी न करता नव्याने भरती करण्यात आलेल्या बारवी धरण प्रकल्पबाधितांना कायमस्वरूपी करण्यात आले. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यात यावे, याकरिता नवी मुंबई महानगरपालिका प्रकल्पग्रस्त शेकडो कर्मचाऱ्यांनी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेतली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, विजय घाटे, महापालिका अधिकारी रमाकांत पाटील उपस्थित होते. सदरबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेणार असून येत्या हिवाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठवून नवी मुंबईतील सर्व प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करणारंच, असे आश्वासन आमदार मंदा म्हात्रे यांनी दिले.
यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले कि, नवी मुंबई प्रकल्पग्रस्त कर्मचारी करार पद्धतीवर सहा महिन्याच्या नियुक्ती आदेशाने किमान वेतनावर गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबई महापालिकेमध्ये अविरत सेवा बजावीत आहेत. बहुतांश कर्मचाऱ्यांचे इतर ठिकाणी नोकरी करण्याचे वय देखील निघून गेले असून सदर कर्मचारी नवी मुंबई महापालिकेमध्ये प्रामाणिक आपली सेवा बजावत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ कर्मचारी कायमस्वरूपी होणे, हा त्यांचा हक्क आहे. तसेच ज्या स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या जमिनीवर हे शहर वसले आहे त्यांच प्रकल्पग्रस्तांना नोकरीत कायमस्वरूपी करणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. बारवी धरणग्रस्त कर्मचाऱ्यांना नवी मुंबई पालिकेमध्ये थेट नियुक्ती केली गेली. त्याच धर्तीवर नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनाही कायमस्वरूपी करण्यात यावे, याकरिता लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेणार असून येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार आहे. महापालिका अस्थापनेत काम करणाऱ्या सर्व प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करून देणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.