फोटो -सोशल मीडिया
सोलापूर : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बार्शीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये शरद पवार गटाच्या नेत्यांनी तुफान राजकीय फटकेबाजी केली आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवरुन राज्य सरकारला घेरले असून महायुतीवर निशाणा साधला आहे. या शेतकरी मेळाव्यामध्ये आमदरा रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले. त्यांचे कतृत्व काय असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील रोहित पवार यांनी लक्ष केले.
काय म्हणाले रोहित पवार?
आमदार रोहित पवार यांनी बार्शीमधून राजकीय टोलेबाजी केली. ते म्हणाले, “काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, इतिहासात कर्तृत्वाला स्थान असते, पण मला देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास बघायचा आहे. त्यांचं कर्तृत्व काय? त्यांनी कुटुंब फोडलं, पक्ष फोडले. जेव्हा थोर व्यक्तींवर बोलल्या गेलं, तेव्हा ते शांत होते, जेव्हा तुकाराम महाराजांच्या विरोधात बोललं गेलं, तेव्हाही ते शांत होते. आज राज्यातला शेतकरी आत्महत्या करतो आहे, तेव्हा ते शांत आहेत, राज्यात आज गुंडांचे राज्य आलं आहे, पण ते शांत आहेत, मग याला काय म्हणायचं? हेच तुमचं कर्तृत्व आहे का? लोकसभेला जसं लोकांनी तुमचं कर्तृत्व धुवून काढलं, तसं या विधानसभेलाही लोक तुम्हाला धडा शिकवतील”, अशी घणाघाती टीका रोहित पवार यांनी केली आहे.
अजित पवारांनाही साधला निशाणा
आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लक्ष्य केलं. “केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान झालं. मात्र, त्यावर राज्यातले नेते काहीही बोलत नाहीत. काही दिवसांपूर्वी अजित पवार म्हणाले की केंद्र सरकारने कांद्याबाबत घेतलेला निर्णय चुकीचा होता, पण खरं तर अजित पवार हे सत्तेत आहेत, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना खरंच शेतकऱ्यांचा कळवळा असता, तर त्यांनी दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले असते”, अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली.