मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) प्रदान सोहळा कार्यक्रम रविवारी सकाळी पार पडला. भर दुपारी पार पडलेल्या याच कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या काही जणांना तीव्र उष्णतेचा मोठा त्रास जाणवू लागला. त्यानंतर अनेक श्री सेवकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. पण याच मुद्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत यावर भाष्य केले.
काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते…
— Raj Thackeray (@RajThackeray) April 17, 2023
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) झालेल्या या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने गर्दी होती. यावेळी अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण सन्मान देण्यात आला. पण प्रचंड उष्णतेचा त्रास तेथील उपस्थितांना झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वस्थ होऊ लागले. पण यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली. त्यात आता राज ठाकरे यांनी यावर भाष्य केले. याबाबत त्यांनी ट्विट केले असून, त्यामध्ये म्हटले की, ‘काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला. ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेव्हा घोषित झाला तेव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच त्यांनी पुढे म्हटले की, ‘कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे, असेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे.