राजू पाटील यांचा एकनाथ शिंदेंना टोला
Raju Patil News Marathi: कल्याण तालुक्यात असलेली १४ गावे पूर्वी नवी मुंबई महापालिकेत होती. मात्र मालमत्ता कराचा भार पडल्यामुळे ही गावे महापालिकेतून बाहेर पडली. त्यानंतर या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा जीआर काढला गेला. याच भागातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे निवडणूक लढवत होते. याचदरम्यान आता मनसे नेते राजू पाटील यांनी “१४ गावे नवी मुंबईत गेली आहे. १४ गावांसाठी निधी यायला पाहिजे. नगरविकास खाते यांच्याकडे आहे. मुलांचा मतदार संघ आहे. ग्रामपंचायतीच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी खासदार येतात. तर बाबांन सांगा ना. सकाळच्या नाष्टाच्या टेबलवर. नगरविकास खाते त्यांच्याकडे आहे. फक्त लोकांना वेठीस धरण्याचे कामे सुरु आहे. तुम्ही आमच्या मागे या तर तुमची कामे करु”, असा टोला मनसे नेते राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना लगावला आहे.
गणेश नाईक यांनी १४ गावांच्या विषयी जी लक्षवेधी टाकली होती. तेव्हा त्यांनी जो प्रश्न विचारला, त्याच मागणीवर ते आजही ठाम आहेत. त्यावेळचे तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी या गावांच्या पायाभूत सोयी सुविधांकरीता पाच हजार कोटीचा खर्च करावा लागेल.गावांकरीता ५९१ कोटी द्यावे लागतील. अतिक्रमणे काढावी लागतील. ज्या हिशोबाने त्यांनी मागणी केली. त्या हिशोबाने त्याची तरतूद बजेटमध्ये करायला हवी होती. त्यांच्या वक्तव्य हे बजेटनंतर आले आहे. इथल्या आमदारांनी ही मागणी करायला हवी होती. ही गावे काढली त्यासाठी निधी दिला पाहिजे. माझा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. १४ गाव संघर्ष समिती पाठपुरावा करीत होती. हा विषय रेगांळून ही गावे पुन्हा कचरा टाकण्यासाठी ठाण्यात घेण्याचा विषय आहे का. मला वाटते नगरविकास खात्याचे मुख्य आहेत एकनाथ शिंदे त्यांनी इथे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या मुलाच्या इलेक्शनच्या वेळेस इलेक्शनपुरती ही बाब पुढे ढकलली.मी तेव्हाच विरोध करणार होते असे नाईक साहेब म्हणाले. नक्की यांचे ठरले काय होते. इलेक्शन पुरते गावे घ्यायची. हा विषय टांगता ठेवून आगरी लोकांचा केवळ राजकारणासाठी उपयोग करायाचा का अशीच ही गावे वाऱ्यावर सोडून द्यायची का? माझी एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, त्वरीत या १४ गावांसाठी त्यांनी निधी जाहिर करावा.
या १४ गावात टनेल करुन नवी मुंबईशी ही गावे जोडता येतील. मग नाईक साहेब कशाला बोलतील. इथे जे गोडाऊन आहेत. यांचेच कच्चेबच्चे आहे. मी अनेक पत्रे दिली आहे. ही गोडाऊन काढा. होमगार्डच्या सहा सात एकर जागेवर गोडाऊन बांधले आहे. कुठे तरी यांचा वरद हस्त दिसतोय. अजूनही याची भूक भागलेली नाही. म्हणून ते हे चालले नाही ना अशी संशयाला जागा आहे. म्हणून माझे सांगणे आहे की, नाईक साहेब बरोबर बोलले आहेत. त्यांची भावना बरोबर आहे. २० वर्षे त्यांनी नवी मुंबईत टॅक्स वाढविलेला नाही. शहरावर प्रेम आहे. यांचे सारखे नाही ओरबडून घ्यायचे. ही गावे आगरी बहुल गावे आहे.यातून निश्चीत काही तरी मार्ग काढावा, अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिली आहे.
तर नवी मुंबईकरांवर आर्थिक भार टाकून ही गावे जर महापालिकेत घेतली जात असतील तर त्याला सर्वांचाच विरोध आहे. या गावांचा समावेश करण्यासाठी पालिका प्रशासनाने शासनाकडे सुमारे साडेसहा हजार कोटींची मागणी केलेली आहे. गावातील अतिक्रमणे शासनाने हटवावीत आणि साडेसहा हजार कोटींचा निधी पालिकेला द्यावा. त्यानंतरच या गावांचा नवी मुंबईत समावेश करण्यात यावा असेही गणेश नाईक यांनी स्पष्ट केले आहे.