नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा स्टँड व सेक्टर ३० बस स्थानकामधील रस्त्यांची तसेच पदपथांची तात्काळ सुधारणा / दुरुस्ती करण्यासंदर्भात आज गुरुवार, दिनांक २४ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता आर. एन. दिवेकर यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले आहे.
सानपाडा रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा स्टँड व सेक्टर ३० बस स्थानकामधील रस्त्यांची व पदपथांची पावसाळ्यात मोठी दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे येथे पावसाळ्यात मोठे खड्डे तयार झाले असून रस्त्यांची चाळण झालेली आहे. मोठ्या प्रमाणात येथे रस्त्यावर पावसाचे पाणी जमा होत आहे. त्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येने रेल्वेने प्रवास करणाऱ्या सानपाडा विभागातील रहिवाशांना रेल्वे स्थानकाबाहेर बस आणि रिक्षा पकडताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे योगेश शेटे यांनी सिडकोला दिलेल्या पत्रात सांगितले आहे.
एका महिन्यापूर्वी सिडकोकडून रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा स्टँडमधील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर आठवड्याभरातच पुन्हा खड्डे पडले. त्यामुळे प्रवाशांचे दररोज प्रचंड हाल होत असून त्यांच्याकडून सिडकोच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी संताप व्यक्त केला जात आहे. यावेळी सिडकोने डांबरीकरणाच्या नावाखाली रिक्षा स्टँडमधील रस्त्याच्या केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या माध्यमातून जनतेला जुना लावण्याचे काम केल्याचा आरोप योगेश शेटे यांनी यावेळी केला आहे.
त्यामुळे सदर ठिकाणचे रस्ते व पदपथांची सुधारणा / दुरूस्ती करणे आवश्यक आहे. याबाबत सानपाडा विभागातील रहिवाशांच्या अनेक तक्रारी मनसे सानपाडा शाखेत प्राप्त होत असल्याचे योगेश शेटे यांनी सिडकोला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सदर रस्ता व पदपथ सिडको अखत्यारीत असल्यामुळे रस्त्याची व पदपथाची सुधारणा तात्काळ करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सानपाडा विभागातील रहिवाशांना सोबत घेऊन ‘ मनसे स्टाईल ‘ ने सिडको विरोधात मोठं जनआंदोल करण्याचा इशारा योगेश शेटे यांनी पत्रातून सिडकोला दिला आहे. लवकरच सिडकोचे संबंधित विभागाचे अधिकारी सदर ठिकाणी रस्त्याची व पदपथांची पाहणी करणार असल्याचे आश्वासन सिडकोचे कार्यकारी अभियंता श्री. आर. एन. दिवेकर यांनी मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांना यावेळी दिले आहे.