नाशिक : मतदारसंघात सर्वाधिक शिक्षणसंस्था काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या (Congress-Ncp) असतानाही शिवसेना (Shivsena) पुरस्कृत शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या दणदणीत पराभवाने महािवकास आघाडीत अंतर्गत कुरघाेडी सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी शुभांगी पाटील यांचा मोठा पराभव करुन सर्वांनाच धक्का दिला.
राज्यात लक्षवेधी ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी तब्बल २९ हजार ४६५ मतांनी शुभांगी पाटील यांचा दणदणीत पराभव केला. तांबेंच्या या विजयाने महािवकास आघाडीतील ‘एकाेपा’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शुभांगी पाटील यांनी शिवसेना पुरस्कृत अपक्ष म्हणून उमेदवारी केली हाेती. परंतु या निवडणुकीत काॅंग्रेसने वरून शुभांगी पाटील अन् आतून सत्यजित तांबे असे काम केल्यानेच शुभांगी पाटील यांचा पराभव झाल्याची चर्चा शिवसैनिकांत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला काॅॅंग्रेस, राष्ट्रवादीची साथ मिळाली नाही, हे या माेठ्या पराभवाने सिद्ध झाले आहे.
दरम्यान, पदवीधरांनी पुन्हा एकदा तांबे घराण्यावर विश्वास दाखवत सत्यजित तांबे यांना विधानपरिषदेवर पाठविले. रात्री अकरा वाजता पाचव्या फेरीचा कल हाती आला. दुसऱ्या फेरीपासूनच तांबे यांनी विजयाकडे कूच केली होती. नाशिक पदवीधर निवडणूक अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विरुद्ध महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यात सरळ लढत होती.
गुरुवारी सकाळ्पासून सैय्यद पिंप्री येथील गोदामात मतमोजणीची प्रक्रियेस सुरवात झाली. गुरुवारी दुपारी अडीच वाजेला पहिल्या फेरीला सुरवात झाली. पहिल्या फेरीतच तांबे यांना १५ हजार ७८४ मते मिळाली. तर यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या शुभांगी पाटील यांना ७ हजार ८६२ एवढीच मते मिळाली. पहिल्या फेरीतच तांबे यांना ७ हजार ९२२ मतांची मोठी आघाडी मिळाली. पुढे ही आघाडी दुसऱ्या फेरीत ही कायम राहत तांबे यांना ३१ हजार तर शुभांगी पाटील यांना १६ हजार ३१६ एवढी मते पडली. तीसऱ्या फेरीत पुन्हा तांबे यांनी आघाडी कायम ठेवत ४५ हजार ६६० मतांचा पल्ला पार पाडला. शुभांगी पाटील या २१ हजार ९२७ एवढ्या मतांवरच राहिल्या. तिसऱ्या फेरी पर्यंत शुभांगी पाटील २० हजार ७३३ मतांनी पिछाडीवर पडल्या होत्या. तिसऱ्या फेरीअखेर झालेल्या मतदानापैकी ८४ हजार मतांची मोजणी झालेली होती. चौथ्या फेरीत सत्यजित तांबेंना ६० हजार १६१ पर्यंत मतदान गेले तर शुभांगी पाटील यांना अवघी ३३ हजार ७७६ मतांपर्यंत मजल मारता आली. यानंतर पाटील तब्बल २६ हजार मतांच्या फरकाने मागे पडल्या होत्या. चौथ्या फेरी पर्यंत १ लाख १२ हजारपर्यंत मतांची मोजणी झाली होती. अखेर पाचव्या फेरीत २९ हजारांनी तांबे यांनी पाटील यांचा पराभव केला.
दरम्यान नाशिक पदवीधरासाठी सोमवारी (दि. ३०) मतदान झाले होते. एकूण २ लाख ६२ हजार मतदानापैकी केवळ १ लाख २९ हजार ४५६ मतदान होऊन ४९.२८ टक्के मतदानाची टक्केवारी झाली होती. गुरुवारी सकाळपासून मतदानाचे गठ्ठे तयार लावून प्रत्यक्षात दुपारी अडीच वाजेला पहिल्या फेरीला सुरवात झाली होती.
राजकीय नाट्यांनी गाजली निवडणूक
नाशिक पदवीधर निवडणुकीत प्रारंभी पासून मोठे नाट्य पाहवायस मिळाले. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र तीन वेळेसचे आमदार डॉ. तांबे यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यांच्या जागी पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणत खळबळ उडाली होती. तांबे परिवाराने काॅॅंग्रेसचा घात केल्याचा आरोप काॅॅंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येऊन पिता पुत्रांचे पक्षातून निलंबणदेखील कारण्यात आले. या सर्व घडामोडीत महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. त्यामुळेच तांबे विरुद्ध पाटील यांच्यातच ही लढत होणार होती. हा सामना अटीतटीचा होईल अशी चर्चा सर्वत्र होती. मात्र अनुभवी असलेले डॉ. तांबे व त्यांचे पुत्र सत्यजित यांनी या सर्व चर्चा आणि दावे फोल ठरविले.
भाजपाचा छुपा पाठिंबा
सत्यजित तांबे यांच्या पाठीमागे भाजप असून तांबे यांच्या विजयासाठी अगदी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्न केल्याची चर्चा आहे. इतरत्र भाजपला अपयश आले असले तरी नाशिक पदवीधर निवडणुकीत आम्ही दिलेल्या छुप्या पाठिंब्यामुळे तांबे यांचा विजय सहज झाल्याचे भाजप पदाधिकारी सांगत आहेत. दरम्यान, यावरुन भाजपने प्रत्यक्षात उमेदवार न देता त्यांचा प्लॅन यस्यशस्वी करुन दाखवला.
चार फेरीत दोन्ही उमेदवारांना पडलेली मते
सत्यजित तांबे : पाहिली फेरी – १५ हजार ७८४, दुसरी फेरी – ३१ हजार ९, तिसरी फेरी – ४५ हजार ६६०, चौथी फेरी – ६० हजार १६१, पाचवी फेरी – ६८ हजार ९९९
शुभांगी पाटील : पहिली फेरी – ७ हजार ८६२, दुसरी फेरी – १६ हजार ३१६, तिसरी फेरी – २४ हजार ९२७, चौथी फेरी ३३ हजार ७७६, पाचवी फेरी – ३९ हजार ५३४