मुंबई : खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेत शिंदे गटात प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून आतापर्यंत १३ खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत.
शिंदे गटातील नेत्यांप्रमाणेच गजानन किर्तीकर यांनीही अनेकदा उघडपणे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाविकास आघाडीसोबतच (MVA) असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळेच गजानन किर्तीकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याचे म्हटले जात आहे. गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाने त्यांची नेतेपदावरुन हकालपट्टी केली. मात्र, त्यांचे सुपूत्र अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला.
ठाकरे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ हे उपस्थित होते.
पिता शिंदे गटात गेले असले, तरी त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा निर्णय वैयक्तिक असल्याचे अमोल यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अमोल किर्तीकर यांची शिवसेना उपनेते पदावर नियुक्ती केली. त्यामुळे ठाकरेंच्या विश्वासाला जागत अमोल यांनी वडिलांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.