कोकणसाठी विशेष गाड्या (File Photo)
अमरावती : गणेशोत्सवासाठी कोकणात लाडक्या बाप्पाच्या भेटीसाठी जाणाऱ्या हजारो भाविकांसाठी मध्य रेल्वेने २५० विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. त्यातच आता या गाड्यांच्या व्यतिरिक्त आणखी ४४ गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत. पण विदर्भवासियांना गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्यांची अद्यापही प्रतीक्षा आहे.
आतापासूनच गणेशोत्सव तसेच महालक्ष्मी पूजनाच्या कालावधीसाठी अमरावती, बनेराहून मुंबई, पुणे, अहमदाबादकडून येणाऱ्या व जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. गणेशोत्सवाला २७ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. गणेशोत्सवाच्या आधी दोन ते तीन दिवसांचे तसेच गणेशोत्सवादरमान व गणेशोत्सवा नंतरचे तीन ते चार दिवस आरक्षण मिळेनासे झाले आहे. या कालावधीत मुंबई, पुणे, अहमदाबादसह इतर मोठ्या शहरांमध्ये राहणारे चाकरमाने, विद्यार्थी, तसेच संपूर्ण कुटुंबच गृहनगरात येऊन हा उत्सव आप्त, मित्रांसह साजरा करत असतात.
गणेशोत्सव आटोपला की, पुन्हा कर्तव्यस्थळी परत जातात. त्यामुळे आतापासूनच गणेशोत्सव तसेच महालक्ष्मी पूजनाच्या कालावधीत अमरावती सीएसएमटी एक्स्प्रेस, अमरावती-पुणे एक्स्प्रेस, अमरावती-जबलपूर, अमरावती पुणे (रात्री १०.५०), गीतांजली एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस या सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्यामुळे प्रवासी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केव्हा होते, याची वाट बघत आहेत. काहींनी पर्याय म्हणून ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचे नियोजन केले असून ज्यांच्याकडे स्वतःची वाहने आहेत, त्यांना नाईलाजाने त्यांच्या वाहनातून गृहनगरापर्यंत प्रवास करावा लागणार आहे.
दीड ते दोन महिने आधीच आरक्षण
थेट अमरावतीला येणे जमत नसेल तर बडनेरा येथे उतरून अमरावतीला येणेही फारसे अवघड नाही. त्यामुळे मुंबई, पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बहुतेक सर्वच सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळेनासे झाले असून, हीच स्थिती परतीच्या आरक्षणाची आहे. कारण, बहुतेकांनी दीड ते दोन महिने आधीच आरक्षण करून ठेवले आहे. त्यामुळे ज्यांनी ऐनवेळी गृहनगरात येण्याचा निर्णय घेतला, त्यांना मात्र, रेल्वेच्या आरक्षणासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
ट्रॅव्हल्सचे तिकीट दर वाढणार
सणासुदीच्या काळात खासगी प्रवासी बसगाड्यांचे भाडेदर वाढवले जाते. ऐनवेळी प्रवास करणाऱ्या गरजू प्रवाशांना कुठलाही पर्याय नसतो, अशा स्थितीत महागडे तिकीट खरेदी करून खासगी बसमधून त्यांना प्रवास करावा लागतो. गणेशोत्सव, महालक्ष्मीपूजन आणि इतर सणांच्या वेळी नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने पुणे, मुंबई येथे स्थलांतरीत झालेले लोकांना आपल्या गावी येण्याचे वेध लागतात. त्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासनाने व्यवस्था करावी, अशी मागणी समोर आली आहे.