वसई-विरारमध्ये ३३ धोकादायक दरडप्रवण क्षेत्र; पालिकेने यादी जाहीर
वसई-विरार क्षेत्रात दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता असलेली ३३ दरड प्रवण क्षेत्रांची यादी पालिकेने जाहीर केली आहे. पावसाळ्यात दरड कोसळून अपघात होण्याच्या अनेक घटना वसई-विरार परिसरात घडल्या आहेत. त्यात कित्येक रहिवाशांचे बळीही गेले आहेत. डोंगर पोखरुन उभारलेल्या अनधिकृत चाळींवर दरड कोसळून अपघात झाल्याच्या घटना दर पावसाळ्यात घडत आहेत. त्यामुळे धोक्याची सुचना म्हणून अशा दरड प्रवण क्षेत्रांची यादी जाहीर करुन पालिकेमार्फत सावधगिरीच्या सुचना दिल्या जातात. अशा संभाव्य अपघातजन्य ठिकाणांची यादी पालिकेने जाहीर केली आहे. यावर्षी केलेल्या सर्वेक्षणात ३३ ठिकाणे भूस्खलन आणि दरड प्रवण क्षेत्र घोषित करण्यात आली असून अशा ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
Thane News : ठाणे-कल्याण पट्टा बनतोय मृत्यूचा सापळा; २९,३२१ जणांना गमवावा लागलाय जीव
डोंगरावर वस्त्या
वसई विरार शहरातील बहुतांश भाग डोंगराळ आहे. या डोंगराच्या पायथ्याशी आणि डोंगरावरही नागरिकांच्या वस्त्या आहेत.
तर काही ठिकाणी डोंगर पोखरून अगदी डोंगराच्या जवळपास भूमाफियांनी चाळी उभारल्या असून या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येने नागरी वस्ती आहे.
काही वेळा
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे डोंगर भागातील माती पोकळ होऊन भूस्खलन होणे, दरड कोसळणे अशा घटना घडत असतात. यापूर्वी वसई पूर्वेच्या राजावळी -वाघराळपाडा येथे दरड कोसळण्याची घटना घडली होती. पावसाळ्यात अशा घटना घडू नये यासाठी महापालिका सज्ज झाली आहे.
पेल्हार, वालीवमध्ये धोकादायक क्षेत्रे
मोरेगाव डोंगर नालासोपारा (पूर्व), कारगिल नगर टेपाचा पाडा, जिवदानी पाडा, आण्णा पाडा, राक्षसी पाडा, साईनाथ झोपडपट्टी, वैष्णव जिवदानी कॉम्प्लेक्स विरार पूर्व, जोत्स्ना अपार्टमेंट साईनाथ नगर, वनोठा पाडा, आचोळे डोंगरी, पडखळ पाडा, तुळींज सेवालाल नगर, निळेगांव डोंगरी नालासोपारा, संतोषभवन, शिर्डीनगर, कानुपाडा, वालई पाडा, पाच आंबा, आझाद नगर, विष्णु नगर, शांतीनगर नवजिवन, गडगापाडा, धानिव, शिरसाड, इंदिरानग र वसाहत, बिलालपाडा, अलंगपाडा, सातीवली खिंड, गोखिवरे भागपाडा, गोखिवरे, बंजार पाडा, भोयदापाडा, सातीवली डोंगरी, राजावळी, वाघरालपाडा, जानकीपाडा, गोखिवरे अशी ३३ ठिकाणे पालिकेने दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. यातील सर्वाधिक दरड प्रवण क्षेत्रे पेल्हार आणि वालीव या दोन प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील आहेत.
नागरिकांना भेट देण्यात आल्यात विशेष सूचना
मागील वर्षी दरड प्रवण क्षेत्रांची ठिकाणे १५ होती. वाढत्या अनधिकृत चाळी, पोखरण्यात येणारे डोंगर यामुळे यावर्षी ३३ ठिकाणांची नोंद झाली आहे.
अशा ठिकाणांवर पालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले असून त्या ठिकाणी जनजागृती करणे, त्याभागात राहणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन त्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सूचना फलकही लावण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.