अँटनी वेस्टतर्फे कांजूरमार्ग येथे ‘एंड-ऑफ-लाईफ’ प्लास्टिक कचऱ्यापासून टिकाऊ बिटुमेन रस्ताबांधणी
पायाभूत सुविधा आणि कचरा व्यवस्थापनासाठी अँटनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेडने (AWHCL) एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. कांजूरमार्ग येथील प्रक्रिया केंद्रातून निर्माण होणाऱ्या ‘एंड-ऑफ-लाईफ’ प्लास्टिकच्या कचऱ्याचा वापर करून त्यांनी एक रस्ता प्रायोगिक तत्वावर तयार केला आहे. हा 270 मीटर लांब रस्ता आयआयटी मुंबईच्या सहकार्याने बांधण्यात आला आहे. या उपक्रमामुळे लँडफिलमध्ये पडून राहणारा कचरा उपयोगात आणण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या रस्त्याच्या बांधकामासाठी बिटुमेनमध्ये 6% वितळवलेले आणि तुकडे केलेले प्लास्टिक वापरले गेले. हे प्लास्टिक थेट कांजूरमार्ग प्रक्रिया केंद्रातील न वापरता येणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यातून मिळविण्यात आले. या पद्धतीमुळे पारंपरिक बिटुमेनवर अवलंबित्व कमी होते आणि पुनर्वापर न करता येणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या सोडवली जाते. या रस्त्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा केंद्रामध्ये तपासण्यात आला आहे.
18 जानेवारी 2025 रोजी या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पाचे नेतृत्व आयआयटी मुंबईच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील पर्यावरणीय भू-तंत्रज्ञान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. डी.एन. सिंह यांनी केले. तांत्रिक कामांचे मार्गदर्शन अँटनीच्या पंकज चव्हाण यांनी केले. याशिवाय आयआयटी मुंबईचे पोस्टडॉक्टोरल फेलो डॉ. सुरेंदर सिंह आणि रिसर्च स्कॉलरमृणाल यांनीही पुढील मार्गदर्शन केले.अँटनी वेस्टचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक जोस जेकब यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमाबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “भारत सरकारच्या हवामान बदलाशी संबंधित प्राथमिक उद्दिष्टे साध्य करण्याच्या वचनबद्धतेशी हा प्रायोगिक प्रकल्प सुसंगत आहे.
कांजूरमार्ग प्रक्रिया केंद्रातून मिळालेल्या प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून आम्ही कचऱ्याच्या समस्येला पायाभूत सुविधांच्या उपाययोजनेत परिवर्तीत केले आहे. हा रस्ता आमच्या टीमच्या सृजनशीलतेचा आणि वचनबद्धतेचा उत्तम पुरावा आहे. ही यशोगाथा कचरा व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा विकास या दोन्ही क्षेत्रांत अशा टिकाऊ उपाययोजनांच्या व्यापक अंगीकाराला प्रेरणा देईल, अशी आम्हाला आशा आहे.”
प्रा. डी.एन. सिंह यांनी सांगितले, ” प्लास्टिक कचरा, विशेषतः लँडफिलमध्ये पडून असलेला एंड-ऑफ-लाईफ प्लास्टिक, पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह पद्धतीने वापरला जाऊ शकतो, हे या प्रकल्पातून दिसून येते. यामुळे, न वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांमध्ये उपयोग करण्यासाठी नवीन शक्यता निर्माण होतात आणि पर्यावरणीय समस्यांवरील समाधानही प्राप्त होते.”
अँटनी वेस्टची उपकंपनी अँटनी लारा एन्व्हायरो सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि आयआयटी मुंबई यांच्यातील सहकार्याने कचरा व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा विकास यांची सांगड घालण्यासाठी एक नवा मापदंड स्थापित केला आहे. लँडफिलमध्ये पडून राहणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा उपयोग टिकाऊ आणि पर्यावरणपूरक रस्ते बांधण्यासाठी प्रभावीपणे कसा केला जाऊ शकतो, हे या प्रकल्पातून दिसून येते. हा क्रांतिकारी उपक्रम भारतभरातील अशा स्वरुपाच्या प्रकल्पांना प्रेरणा देईल, अशी अपेक्षा आहे. न वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा पुनर्वापर कचरा व्यवस्थापन आणि टिकाऊ पायाभूत सुविधा विकासासाठी उपाय म्हणून कसा उपयोग होऊ शकतो, हे या प्रकल्पातून अधोरेखित होते.
Trident Hotel Woman Dead : मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये आढळला 60 वर्षीय महिलेचा मृतदेह, मृत्यूचे कारण अस्पष्ट