आशियातील सर्वात मोठ्या मुंबई महापालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प मंगळवारी सादर होणार आहे. गेल्या वर्षी 59 हजार 954 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला होता. मात्र यंदा महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.
यंदाचा अर्थसंकल्प 60 हजार कोटींचा आकडा पार करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेच्या मुदत ठेवीत होत असलेली घट आणि वाढत चाललेला अर्थसंकल्पाचा आकडा, त्यामुळे मुंबईकरांवर करवाढीचं सावट आहे.
महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहे. मुंबई महापालिकेने गेल्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी झाली नसून मुंबईकर नाराज आहेत. गेल्या अर्थसंकल्पता महिला सुरक्षेसाठी अॅप, प्रदूषणकारी गाड्यांची विल्हेवाट यांसह महसूलवाढीच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. या घोषणा कागदांवर राहिल्या आहेत. त्यामुळे जुन्या घोषणांना पुन्हा मुलामा देणारा अर्थसंकल्प ठरतो की, नव्या घोषणा केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात रस्ते व वाहतूक प्रकल्पांसाठी 3 हजार 200 कोटी, त्याअगोदरच्या वर्षी 2 हजार 561 कोटी रुपये तरतूद होती. यंदा यात किती वाढ होणार याची उत्सुकता आहे. मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन हा महत्त्वाचा विषय आहे. कचरा वर्गीकरण, क्लीन अप मार्शलकडून आकारल्या जाणाऱ्या दंडात वाढीसाठी यात यंदा काही नवीन घोषणा होणार का, हा चर्चेचा विषय आहे.
पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे वाढविले जात आहे. नवनवीन उपायायोजना, प्रस्ताव, शुद्ध पाणीपुरवठ्याचा विषय आहे. यासाठी वाढीव तरतूद करावी लागणार आहे. सार्वजनिक आरोग्याची आव्हाने वाढली आहेत. तसेच बदलत्या शिक्षणपद्धतीमुळे, या दोन्ही विभागासाठी भरीव तरतूद करावी लागणार आहे.
मुंबई महापालिकेने गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात महिला सुरक्षेवर अधिक भर देणार असल्याची घोषणा दिली होती. त्यासाठी अॅप तयार करून, महापालिका आणि पोलिस यंत्रणेशी जोडले जाणार होते. परंतु हे सर्व काही कागदावरच राहिले.
मुंबईच्या यंदाच्या अर्थसंकल्पात करवाढीचा अंदाज वर्तवला जात आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आक्रमक आहे. परंतु अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नको, असे अगोदर शिवसेना ठाकरे पक्षाने बजावून ठेवले आहे. करवाढ न करता अर्थसंकल्प सादर करून मुंबईकरांना दिलासा द्यावा, असेही शिवसेना ठाकरे पक्षाने म्हटले आहे.