रेडिओ क्लब येथे नवीन धक्का कधी सुरु होणार? नितेश राणेंनी दिली माहिती
मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे काम विहीत कालावधीत पूर्ण होऊन नागरिकांसाठी वॉटर टॅक्सी सेवेत आणण्यासाठी या कामाला वेग द्यावा, असे निर्देश मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी रेडिओ क्लब जेट्टीच्या कामाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
रेडिओ जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून नवी मुंबईसाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करावयाची आहे. त्यादृष्टीने या प्रकल्पाचे काम कुठल्याही प्रकारे रखडता कामा नये. जेट्टीच्या कामात 25 फेब्रुवारीपर्यंत गती न दिसल्यास कंत्राटदारावर कारवाई करावी. निविदेत दिलेल्या कालावधीत जेट्टीचे काम पूर्ण करण्यात यावे. या कामाचा प्रत्येक आठवड्यात प्रगती अहवाल सादर करावा, असे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी दिले.
रेडिओ क्लब जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातून नवीन जलमार्ग विकसित होतील. त्यामुळे नागरिकांना अधिक जलमार्गाचा पर्याय देऊन नवी मुंबईला थेट जोडणी देता येईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि तेथून दक्षिण मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीचे होईल, असेही बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
नवनवीन उत्पन्नाचे स्त्रोत शोधत विभागाने आपले उत्पन्न वाढवावे. उत्पन्न वाढीसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची विनाविलंब अंमलबजावणी करावी. या स्त्रोतांमधून उत्पन्न वाढवित आत्मनिर्भर व्हावे, असे निर्देश मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. याप्रसंगी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या 85 व्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळालेल्या विषयांची प्रगती, जमीन व्यवस्थापन व जलकिनाऱ्यांचा उपयोग धोरण याबाबतचा आढावा मंत्री राणे यांनी घेतला.
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे निधीबाबत शासनाकडील अवलंबित्व कमी करण्यासाठी उत्पन्न वाढीसाठी निवडेलल्या पर्यायांवर काम करावे. याबाबत कालमर्यादा पाळत कार्यवाही पूर्ण करावी. उत्पन्न वाढीबरोबरच विभागाच्या माध्यमातून राज्याच्या विकासात भरीव योगदान द्यावे. उत्पन्नाचे स्वत:चे स्त्रोत निर्माण झाल्यास विभागाद्वारे अधिक परिणामकारक आणि पुढाकाराने विकासाची कामे करता येतील. महाराष्ट्र किनारपट्टीसाठी जाहिरात धोरण, किनारपट्टीवरील लहान बंदराच्या हद्दीत भाडेपट्टयाने द्यावयाच्या स्टॉलबाबत अधिसूचना प्रसिद्धीची कार्यवाही पूर्ण करावी.
समुद्र किनाऱ्यालगतचे जमीन व्यवस्थापन व जलकिनाऱ्याचा उपयोग करण्याबाबत सर्वंकष, गुंतवणूकदारांना आकर्षक असणाऱ्या धोरणाची निर्मिती करावी. यासाठी जीआयएसवर आधारित पोर्टलची निर्मिती करण्यात यावी. समुद्रकिनारे लाभलेल्या अन्य राज्यांच्या धोरण, नियमांचा अभ्यास करून गुंतवणूकीस सुलभ धोरण असावे. या माध्यमातून रोजगारनिर्मिती होईल. प्रथम धोरण बनवून त्यानंतर पायाभूत प्रकल्पांसाठी धोरण आणावे, असे निर्देशही मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.






