File Photo : MHADA
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या २,०३० सदनिकांच्या विक्रीकरिता अनामत रकमेसह प्राप्त ०१,१३,८११ पात्र अर्जांची संगणकीय सोडत मंगळवारी (8 ऑक्टोबर) सकाळी १०.३० वाजता सोडत जाहीर करण्यात येणार आहे.सदनिका विक्रीसाठी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे.
सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. तसेच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण (Live) बघण्याची सुविधा म्हाडाच्या @mhadaofficial या युट्यूब चॅनल व फेसबूक पेजवरून करण्यात येणार आहे. वेबकास्टिंगची लिंक म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर व समाजमाध्यम व्यासपीठांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगद्वारे करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे.
सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६.०० वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळविली जाणार आहे. सदर सोडत नवीन संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) द्वारे होत आहे. या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभाग घेत आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ ठरल्यामुळे यंदाच्या वर्षी नागरिकांनी सोडतीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
मुंबई मंडळातर्फे ०९ ऑगस्ट, २०२४ रोजी २०३० सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली. तप १९ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची तर १९ सप्टेंबर, २०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करण्यासाठी विहित मुदत होती. सोडत प्रक्रियेमध्ये एकूण ०१,३४,८११ अर्जदारांनी अर्ज सादर केले. मात्र, त्यापैकी ०१,१३,८११ अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत.
मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णता ऑनलाइन अशा IHLMS २.० या संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या सोडतीचे विभाजन तीन गटांमध्ये करण्यात आले. यामध्ये नव्याने बांधकाम चालू असलेल्या गटामध्ये १३२७ सदनिकांचा समावेश आहे तर दुसर्या गटामध्ये विकास नियंत्रण नियमावली ३३(५ ),(७), ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला प्राप्त झालेल्या ३७० सदनिकांचा समावेश आहे. तसेच तिसऱ्या गटांतर्गत मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या ३३३ सदनिकांचा समावेश आहे.
उत्पन्न गट निहाय या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटातील एकूण ३५९ सदनिकांकरीता ४७,१३४ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. अल्प उत्पन्न गटातील एकूण ६२७ सदनिकांकरीता ४८,७६२ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. मध्यम उत्पन्न गटातील एकूण ७६८ सदनिकांकरीता ११,४६१ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. तसेच उच्च उत्पन्न गटातील एकूण २७६ सदनिकांकरीता ६४५४ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत.
सोडत प्रक्रियेमध्ये अर्जदारांचा लाभलेला प्रतिसाद पाहता विकास नियंत्रण निमयमावली ३३ (५) अंतर्गत गटातील नेहरू नगर, कुर्ला या योजनेतील १४ सदनिकांकरीता ३१२४ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. तर ओशिवरा येथील योजनेतील एका सदनिकेकरीता ५४६ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. तसेच सिद्धार्थ नगर, गोरेगाव येथील २ सदनिकांकरीता ६०२ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. तसेच कन्नमवार नगर , विक्रोळी (४९२ ) या योजनेतील २ सदनिकांकरीता ४४६ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. तसेच विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत भुलेश्वर विभाग वेलकर स्ट्रीट या योजनेअंतर्गत एका सदनिकेकरिता ४२२ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. तसेच मुंबई मंडळातर्फे नव्याने बांधकाम चालू असलेल्या गटामध्ये शिवधाम जुनी दिंडोशी, म्हाडा कॉलनी मालाड (४८६) या योजनेतील एका सदनिकेकरिता २९१ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. शिवधाम कॉम्प्लेक्स जुनी दिंडोशी, म्हाडा कॉलनी मालाड (४७७) या योजनेतील ४५ सदनिकांकरीता ९,५१९ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत.