मुंबईची हवेची गुणवत्ता खालावली, 'मॅरेथॉन' वर होणार परिणाम? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र
आवाज फाउंडेशनच्या अध्यक्षा सुमैरा अब्दुलाली यांनी पालिका आयुक्त, प्रदूषण महामंडळ अधिकारी तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात १ जानेवारी २०२६ पासून मुंबईत धुरकटपणा आणि स्मॉगसदृश स्थिती कायम असल्याकडे लक्ष वेधले आहे. मात्र मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमुळे ‘मॅरेथॉन’ वादात येण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईतील प्रदूषण परिस्थितीत मॅरेथॉनसारख्या दीर्घकाळ चालणाऱ्या शारीरिक कसरतीदरम्यान धावपटूंना मोठ्या प्रमाणात प्रदूषित हवा श्वासात घ्यावी लागते, ज्यामुळे दमा, श्वसनविकार तसेच हृदयावर ताण येण्याचा धोका वाढतो, असे त्यांनी नमूद केले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जानेवारी २०२५ मधील मुंबई मॅरेथॉनपूर्वी करण्यात आलेल्या अभ्यासाचाही संदर्भ देण्यात या पत्रात दिला आहे. विशेष म्हणजे करण्यात आलेली प्रदूषण नोंद पहाटेच्या वेळेत करण्यात आली होती. याच वेळेत मॅरेथॉन धावपटू रस्त्यावर असतात आणि प्रदूषण जमिनीच्या जवळ अडकून राहते. त्यामुळे धावपटूंना दीर्घकाळ अपायकारक हवा श्वासात घेण्याचा धोका असल्याचे या अभ्यासातून समोर आले होते. आवाज फाउंडेशनने यंदाच्या मॅरेथॉनपूर्वी मॅरेथॉन मार्गावर काही दिवस आधीच मोबाइल एअर क्वालिटी मॉनिटरिंग व्हॅन तैनात कराव्यात, अशी मागणी केली आहे.
पत्रावर पालिका प्रशासनाकडून प्राथमिक प्रतिसाद देण्यात आला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्या निर्देशानुसार हे पत्र संबंधित अधिका-यांकडे आवश्यक कार्यवाहीसाठी पुढे पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे मॅरेथॉनपूर्वी हवेच्या गुणवत्तेच्या मुद्दयावर ठोस उपाययोजना होतील का, याकडे आता लक्ष लागले आहे.
नागरिक विज्ञान उपक्रमांतर्गत मॅरेथॉन मार्गावर पहाटेच्या वेळेत पीएम २. ५ चे मोजमाप करण्यात आले होते. या मोजमापांमध्ये काही ठिकाणी पीएम २.५ पातळी ९५ ते १५० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा अधिक आढळली होती. ही पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २४ तासांच्या ६० मायक्रोग्रॅम मानकांपेक्षा तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शवा मर्यादेपेक्षा अनेक पटीने अधिक आढळले. त्यात मॅरेथॉन सकाळी लवकरच सुरु होणार असल्याने गंभीर बाब आहे.






