भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय (फोटो सौजन्य-X)
Mumbai Firecracker Ban : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नेमकं पोलिसांनी काय म्हटलं ते जाणून घेऊया…
एकीकडे भारत-पाकिस्तानचे युद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरमुळे अस्वस्थ झालेला पाकिस्तान जम्मू आणि काश्मीर, अमृतसर आणि राजस्थानच्या सीमेवरील शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला आहे की त्यांच्या तीन हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या डीजी आयएसपीआरने म्हटले आहे की, त्यांच्या पंजाब प्रांतातील नूर खान एअरबेस, मुरीद एअरबेस आणि शोरकोट एअरबेसला लक्ष्य करण्यात आले आहे. एअरबेसवर हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. तथापि, भारताने अद्याप हा हल्ला केल्याची पुष्टी केलेली नाही. याचदरम्यान आता मुंबई पोलिसांकडून महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या काळात कोणतेही स्फोटके, फटाके किंवा इतर ध्वनी किंवा प्रकाश निर्माण करणाऱ्या वस्तूंचा वापर केल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मुंबई पोलिसांनी सूचित केले आहे.
मुंबईत सार्वजनिक शांतता आणि सुरक्षिततेच्या हितासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सीमेवरील तणाव, ऑपरेशन सिंदूर सारख्या कारस्थाने आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जबाबदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर या आदेशाचे उल्लंघन झाले तर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना फटाके फोडून किंवा रॉकेट उडवून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान शुक्रवार-शनिवार रात्री भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला. दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत आणि त्यांच्या सैन्याने एकत्रीकरण केले आहे. शुक्रवारी संध्याकाळी पाकिस्तानने भारतातील २६ ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानच्या हवाई तळांना लक्ष्य केले आणि त्यानंतर पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले. त्याचप्रमाणे पाकिस्तानने भारतावर फतह-१ क्षेपणास्त्र डागले. पत्रकार परिषदेत भारतीय लष्कराने सांगितले की, पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेवर सतत आपले सैन्य वाढवत आहे.