वाढत्या तापमानाचा फटका शाळांनाही; शाळा 22 जूनपासून होणार सुरु (संग्रहित फोटो)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. विदर्भात तापमान अद्याप वाढलेले असून, विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. ही बाब विचारात घेऊन शिक्षण विभागाने फक्त विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा २२ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा २२ जूनपासून सुरू केल्या जाणार आहेत. तर उर्वरित राज्यात मात्र सोमवार १५ जूनपासून नियमित वेळेत शाळा सुरू होईल. सर्व सबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे शिक्षण विभागाने प्रसिद्धीपत्रक काढून सर्व शाळा-महाविद्यालयांना कळवले आहे. संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत एकवाक्यता व सुसंगती आणण्याच्या दृष्टीने सूचना निर्गमित केल्या होत्या.
याच अनुषंगाने राज्यातील शाळांची सन २०२६ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करण्याबाबत सर्व राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना कळविले होते. त्यानुसार, राज्यात सोमवार १५ जूनपासून शाळा सुरू होणार होत्या. विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी व नियमित शाळा सुरू करण्याबाबत बदल करण्यात आला आहे.
तापमानाचा धोका विचारात घेऊन निर्णय
सध्याचा तापमानाचा संभाव्य धोका विचारात घेऊन विदर्भात २२ ते ३० जून २०२६ दरम्यान विदर्भातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरतील. त्यानंतर ०१ जुलै २०२६ पासून शाळा नियमित वेळेत भरतील, असे कळवण्यात आले आहे. सदरचे प्रसिद्धीपत्रक माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर आणि प्राथमिक शिक्षण संचालक डॉ. शरद गोसावी यांनी काढले आहे.
यापूर्वीही उशीरा शाळा झाल्या सुरु
गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील शाळा २६ जूनपासून सुरू होत होत्या. परिसरातील हवामानाचा विचार करून न्यायालयानेही यापूर्वी २६ जूनपासून शाळा सुरू करण्यास समर्थन दिले होते. यंदा मात्र राज्यभर एकसमान दिनांक निश्चित करत शासनाने १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच १५ ते ३० जून या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विदर्भात यंदा तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, जून महिन्यातही अपेक्षित पाऊस झालेला नाही. सध्या अनेक भागात दुपारचे तापमान ४० अंशांच्या वर कायम आहे.






