एसटीच्या उपहारगृहात मंत्र्यांची साधी-सरळ भेट
संगमेश्वर : एसटी बसस्थानक म्हटलं की, अनेकांच्या मनात अस्वच्छता, गर्दीचे वातावरण आणि उपहारगृहांबाबतच्या तक्रारींचे चित्र उभे राहते. मात्र, संगमेश्वर बसस्थानकात शुक्रवारी रात्री घडलेले दृश्य या सर्व समजुतींना छेद देणारे ठरले. कारण महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी चक्क प्रवाशांसोबत बसून एसटीच्या कॅन्टीनमधील गरमागरम वडापाव आणि कॉफीचा आस्वाद घेत सर्वांनाच सुखद धक्का दिला.
कोकण दौऱ्यावर असलेल्या मंत्री सरनाईक यांनी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर बसस्थानकाला भेट दिली. नव्याने उभारलेल्या या आधुनिक बसस्थानकात संध्याकाळीही प्रवाशांची मोठी वर्दळ होती. बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि उपलब्ध सुविधांबाबत आपुलकीने चौकशी केली.
यावेळी त्यांनी बसस्थानकातील प्रसाधनगृहे, हिरकणी कक्ष आणि इतर प्रवासी सुविधांची पाहणी करून स्वच्छता व व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. स्वच्छ, टापटीप आणि प्रसन्न वातावरणाने नटलेल्या या बसस्थानकाची पाहणी करत असताना त्यांची पावले नकळत एसटीच्या उपहारगृहाकडे वळली. उपहारगृहात अनेक प्रवासी गरमागरम भजी, वडापाव, चहा आणि कॉफीचा आनंद घेत होते. त्या सुगंधाने आणि प्रसन्न वातावरणाने मंत्रिमहोदयांनाही मोह आवरला नाही. त्यांनी थेट प्रवाशांमध्ये जाऊन बसत गरमागरम वडापाव आणि कॉफीची चव चाखली. एका मंत्र्याने कोणताही बडेजाव न करता सर्वसामान्य प्रवाशांसोबत बसून एसटीच्या कॅन्टीनमधील पदार्थांचा आस्वाद घेणे, हा अनुभव उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.
क्षणभर अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. राज्याचे परिवहन मंत्री आपल्या शेजारी बसून गप्पा मारत वडापाव खात आहेत, हे दृश्य पाहून प्रवाशांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद एकाच वेळी झळकत होता. संगमेश्वर बसस्थानकातील हा प्रसंग केवळ एका पाहणी दौऱ्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर एसटीच्या बदलत्या चेहऱ्याचे आणि प्रवाशांशी जपल्या जाणाऱ्या आत्मीय नात्याचे प्रतीक ठरला.
स्वच्छता, सुविधा आणि गुणवत्तेचा संदेश देणाऱ्या या भेटीने लालपरीच्या सेवेत होत असलेल्या सकारात्मक परिवर्तनाची जिवंत साक्षच प्रवाशांना अनुभवायला मिळाली.
– अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, मंत्री परिवहन.






