पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई : वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगतच्या ग्रामीण भागातील समाविष्ट गावासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रलंबित असलेली कामे याकरिता मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगरपालिका याची एकत्र बैठक घेऊन नळ जोडणीचे ( टॅपिंगचे )कामे तातडीने पूर्ण करावे,असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रालगतच्या ग्रामीण भागातील समाविष्ट गावासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेविषयी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार स्नेहा-दुबे पंडित, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, वसई-विरार महानगरपालिकाचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अभियान संचालक सुषमा सातपुते, कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय मुळे, अजय सिंह उपस्थित होते.
वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील कामांच्या गुणवत्तेबाबत स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी करून घ्यावी. वसई विरार महानगरपालिका पाणीपुरवठा योजनेचे कामे ऑक्टोबर महिन्यापर्यंत वितरण व्यवस्थेची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून पाणी जोडणीसाठी टॅपिंगचे काम पूर्ण होऊन सर्वांना पाणी उपलब्ध होईल यादृष्टीने कारवाई करावी, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले. तसेच अर्नाळा व १६ गावे, तिल्हेर व १२ गावे, अर्नाळा किल्ला व ७ गावे या योजनेंतर्गत प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री गुलबराव पाटील यांनी दिल्या.
मंत्री गुलाबराव पाटलांचे प्रशासनाला निर्देश
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व गावांमध्ये पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात आयोजित धुळे जिल्ह्यातील तसेच शेगाव पाथर्डी मतदारसंघातील गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या आढावा बैठकीत गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार मोनिका राजळे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील शिंदखेडा तालुक्यातील (जि.धुळे) जल जीवन मिशन अतंर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी योजनांतर्गत कामांची पूर्तता विहीत कालमर्यादेत केली जात नाही, अशा विलंबाने काम करत असलेल्या संबंधित कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करुन नोटीस बजावण्यात यावी. कामे हस्तांतरित करुन गतीने पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. धुळे जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या शिंदखेडा गावात नवीन जलकुंभ उभारण्याचे काम तातडीने पूर्ण करावे जेणेकरुन उन्हाळ्यात त्या ठिकाणी ग्रामस्थांना पाणीपुरवठा सहजतेने उपलब्ध राहील, असेही पाटील यांनी सांगितले.