सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. नंतर पोलीस आयुक्तालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
’कोथरूडमधील गुंड नीलेश घायवळ प्रकरणात चंद्रकांत पाटील, तसेच जैन बोर्डिंग प्रकरणात आमचे नाव जोडून काही जण त्यांची राजकीय फायदा उचलत आहेत. कोणतेही पुरावे नसताना थेट आरोप करणे चुकीचे आहे”, असे पाटील यांनी नमूद केले.
पाटील म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष गुन्हेगारी किंवा गुंडांना पाठिंबा देणारा पक्ष नाही. एका विचारधारेतून पक्षाचे सर्व कार्यकर्ते काम करतात. मात्र, कोथरूड गोळीबार प्रकरण, घायवळ परदेशात पसार होणे, त्याला मिळालेले पारपत्र अशा घटनांसाठी आमचा संबंध जोडून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणतेही पुरावे नसताना काही जण आरोप करत आहेत. जैन बोडिंग प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांचे नाव जोडण्यात आले. पुणे शहराचा विस्तार वाढत आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. अशा परिस्थितीत शहराच्या विकासावर चर्चा न करता. केवळ आरोप करुन बदनामीचे प्रकार सुरू आहेत. अशा प्रकारांमुळे पुण्याचे नाव बदनाम होत आहे. अशा प्रकारांमुळे शहराच्या विकासावर परिणाम होत आहे.’
प्रकरणावर बोलणे टाळले..!
पार्थ पवार यांच्या अमोडिया होल्डिंग्ज कंपनीकडून झालेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाबाबत पत्रकारांनी पाटील आणि मोहोळ यांना प्रश्न केला. तेव्हा शहरातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांशी चर्चा केली, असे त्यांनी सांगून पाटील यांनी पार्थ पवार प्रकरणावर भाष्य करणे टाळले.
गुंडांची बेनामी संपत्ती जप्त करा
‘गुंड टोळ्यांना आर्थिक रसद कशी पुरविली जाते. त्यांना कशा प्रकारे पैसे मिळतात. गुंडांनी केलेले बेकायदा गैरव्यवहार प्रकरणात सक्त वसुली संचालनालय (ईडी), प्राप्तीकर विभागाकडून चोकशी करण्यात यावी. त्यांच्या बेनामी मालमत्ता जप्त करण्यात याव्यात, याबाबत पोलिसांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन उपाययोजना कराव्यात’, असे आदेश पाटील यांनी दिले आहेत.






